राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्यावर ठाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • अध्यक्ष निवडीपासून राहुल गांधी अलिप्तच
  • गांधी घराण्यातील कोणीही अध्यक्ष नसेल​

 

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम असलेले राहुल गांधी यांनी आज पुढील अध्यक्षाची निवड मी नाही, तर पक्षच ठरवेल, असे आज स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपले पद सोडण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा निश्‍चय पक्का आहे.

अध्यक्ष निवडीचा निर्णय मी घेणार नाही, असे राहुल यांनी आज सांगितले. अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची आणि या नावाला राहुल यांनी संमती दिल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आपण अशी कोणतीही संमती दिली नसल्याचे राहुल यांनी सांगितले.

राहुल हे पद सोडण्यावर ठाम असले तरी काँग्रेस कार्यकारिणीचे अद्यापही त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून नवीन अध्यक्षही त्यांना अद्याप कोणी सापडलेला नाही. गांधी घराण्यातील कोणीही अध्यक्ष नसेल, असे राहुल यांनी स्पष्ट केल्याने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याही नावाची चर्चा नाही.

‘राफेल’मध्ये चोरी झालीच
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणादरम्यान ‘राफेल’ लढाऊ विमान लवकरच भारतात दाखल होईल, असा उल्लेख केला. यावर राहुल यांनी नंतर प्रतिक्रिया दिली. राफेल खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या दाव्यावर आपण अद्यापही ठाम असल्याचे त्यांनी आज सांगितले. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या प्रचारात ‘राफेल’चा मुद्दा प्रमुख होता.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News