गांधी कुटुंबातील व्यक्ती सोडून कोणालाही अध्यक्ष बनवा, राहुल गांधीं राजीनाम्यावर ठाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम; संसदीय बैठकीत भूमिका

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा राहुल गांधींचा ‘हट्टयोग’ कायम असल्याचे आज पुन्हा एकदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीतून स्पष्ट झाले. ५१ खासदारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करूनही राहुल गांधींनी या निर्णयात बदल होणार नाही, असे ठामपणे सांगितले.

संसद भवनात आज काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राहुल गांधींसह दोन्ही सभागृहांमधील पक्ष खासदार हजर होते. दोन्ही सभागृहांमधील रणनीती आणि अन्य विरोधी पक्षांच्या समन्वयावर चर्चा झाली. मात्र, राहुल गांधींचा राजीनामा हादेखील प्रमुख मुद्दा राहिला.

काँग्रेस खासदारांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. शशी थरूर, मनीष तिवारी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही; तर सामुदायिक जबाबदारी असून, राहुल गांधींशिवाय पक्षाकडे नेतृत्वासाठी अन्य कोणताही पर्याय नाही. या महत्त्वाच्या वेळी पक्षाला नेतृत्वाची नितांत गरज आहे, अशीही साद घातली. परंतु, राहुल गांधींनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर बैठकीनंतर प्रथमच प्रसार माध्यमांसमोर येत राहुल गांधींनी अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. 

गांधी कुटुंबातील व्यक्ती सोडून कोणालाही अध्यक्ष बनवा, असेही राहुल यांनी सांगितले. संपूर्ण बैठकीत सोनिया गांधी काहीही बोलल्या नाहीत, असे कळते. लोकसभा निकालानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीमध्ये राहुल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पक्षातील नेते त्यांना सातत्याने राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News