राहुल द्रविडची सर्व दोषांमधून मुक्तता !

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
  • बीसीसीआय प्रशासकीय समिती देणार स्पष्टीकरण
  • दुहेरी हितसंबंधाच्या मुद्याचा प्रश्‍न निकाली

मुंबई : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्त केलेल्या राहुल द्रविडबाबत आमच्या दृष्टीने तरी दुहेरी हितसंबंधाची अडचण नाही, असा निर्वाळा प्रशासकीय समितीने दिला आहे, परंतु आता चेंडू बीसीसीआयचे लोकपाल आणि निती अधिकारी डी. के. जैन यांच्या कोर्टात असल्याचेही स्पष्ट केले.

आमच्या बाजूने तरी द्रविडबाबत दुहेरी हितसंबंधाच्या मुद्याचा प्रश्‍न निकाली निघालेला आहे. त्याला नोटीस मिळालेली आहे; परंतु आमच्या बाजूने त्याच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवलेला आहे; परंतु लोकपालांना शंका येत असेल तर आम्ही आमचे स्पष्टीकरण देऊ, असे प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर समितीचे सदस्य रवी थोडगे यांनी सांगितले. 

भारतीय क्रिकेटमधील सज्जन आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून लौकिक असलेल्या द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध दुहेरी हितसंबंधाची तक्रार करण्यात आली. तो आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीचा उपाध्यक्ष असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ असेल तोपर्यंत द्रविड इंडिया सिमेंटमध्ये ‘सुटी’वर असेल, असे प्रशासकीय समितीने अगोदच स्पष्ट केलेले आहे. तरीही तक्रारदार संजीव गुप्ताने आपला हेका कायम ठेवून आहे. द्रविडने कंपनीचा राजीनामा दिलेला नाही, असे गुप्ताचे म्हणणे आहे. द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला गरज आहे. खेळाडूंबरोबर प्रशिक्षकही घडवण्याचे काम येथे चालते, असे थोडगे म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News