पुण्याच्या 'पीएच.डी' प्रबंधाचा दर्जा, विद्यापीठ अनुदान आयोग तपासणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

विविध विद्याशाखांमध्ये होणाऱ्या ‘पीएच. डी.’ प्रबंधांचा दर्जा आता विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत तपासला जाणार आहे.

पुणे - विविध विद्याशाखांमध्ये होणाऱ्या ‘पीएच. डी.’ प्रबंधांचा दर्जा आता विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत तपासला जाणार आहे. यासाठी गेल्या दहा वर्षांतील प्रबंधांचा अभ्यास करण्यात येणार आहे.देशभरातील सर्व केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठातील ‘पीएच. डी.’ प्रबंधांचा दर्जा तपासला जाणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 

आयोगाने हा अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘पीएच. डी.’च्या प्रबंधांचा दर्जा घसरत असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे. अनेकदा ‘पीएच. डी.’च्या विषयामध्ये आणि संशोधनातील आशयामध्ये साम्य आढळते. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी आणि  ‘पीएच. डी.’चे प्रबंध हे दर्जेदार असावेत, हा अभ्यासामागील उद्देश असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘पीएच.डी.’चे शीर्षक आणि आशयाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्‍यक असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पीएच.डी.’ प्रबंधांमधील पुनरावृत्ती टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘विद्यापीठ अनुदान आयोग गेल्या दहा वर्षांतील प्रबंधांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्ताव मागविले आहेत. हा अभ्यास होणे गरजेचे असले, तरीही विद्यापीठामार्फत याबाबत विशेष खबरदारी घेतली जाते. पीएच.डी.चा प्रबंध हे सीडी स्वरूपात घेण्यात येतो. त्यामुळे छापील प्रत ही ग्रंथालयासाठी आणि सीडी ही नोंदणीसाठी ठेवण्यात येते.’’

तज्ज्ञांची बॅंक तयार करण्याची गरज - करमळकर 
‘‘प्रबंधाचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक वेळा ‘पीएच. डी.’चे मार्गदर्शक हे दहा संबंधित तज्ज्ञांची यादी संदर्भ म्हणून देतात. परंतु, बहुतेक वेळा अशा पद्धतीने प्रबंधाचे मूल्यमापन करताना दुजाभाव होण्याची शक्‍यता असते. हा दुजाभाव टाळण्यासाठी मूल्यमापनाची वेगळी पद्धत कार्यन्वित करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विषय तज्ज्ञांची ‘बॅंक’ तयार करणे गरजेचे आहे. तसेच, ‘पीएच.डी.’चा प्रबंध अहवाल विद्यापीठाकडे ऑनलाइन पाठविला जावा, यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याचा विचार विद्यापीठ स्तरावर होत आहे,’’ असे कुलगुरू करमळकर यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News