पुणे, मुंबईत अकरावीच्या जागा वाढवल्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत आज घोषणा केली. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण देण्यात आले नाहीत.

पुणे - अकरावी प्रवेशप्रक्रियेत अंतर्गत गुणांवरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला. विज्ञान शाखेसाठी पाच टक्के, तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी प्रत्येकी आठ टक्के जागा वाढविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. 

नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत आज घोषणा केली. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण देण्यात आले नाहीत. तसेच निकालाचा टक्काही घटला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आले. त्यामुळे प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी भीती पालकांनी व्यक्त केली होती. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. आमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत शेलार यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

शेलार म्हणाले, ‘‘अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. तुलनेने राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जागा वाढवून दिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळेल. या महाविद्यालयांच्या मागणीनुसार व त्यांची गरज तपासून वाढीव जागा विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येतील. वाढीव जागा २०१९-२० या वर्षासाठीच आहे. 

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य न धरण्याचा निर्णय शेलार यांनी रद्दबाबत ठरविला. याबाबत कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी हे गुणवत्तेने गुण मिळविले आहेत. ते गुण ग्राह्य धरले पाहिजेत, असा आग्रह होता. तो शिक्षणमंत्र्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टळला आहे.’’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News