ही आहेत पुण्यातील सर्वात मोठी महाविद्यालये 

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

आज बदलत्या शिक्षणपद्धतीसोबत शिक्षण देण्याऱ्या संस्थांमध्ये देखील बदल घडत आहे. यामध्ये महाविद्यालये देखील मागे नाहीत. मुंबईत अनेक प्रसिद्ध आणि उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याऱ्या संस्था आहेत. मात्र पुणे देखील यामध्ये मागे नाही. 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणेच पुण्यातील काही उच्च दर्जाची महाविद्यालये आहेत, पाहुयात या महाविद्यालयांची थोडक्यात माहिती..!

आज बदलत्या शिक्षणपद्धतीसोबत शिक्षण देण्याऱ्या संस्थांमध्ये देखील बदल घडत आहे. यामध्ये महाविद्यालये देखील मागे नाहीत. मुंबईत अनेक प्रसिद्ध आणि उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याऱ्या संस्था आहेत. मात्र पुणे देखील यामध्ये मागे नाही. 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणेच पुण्यातील काही उच्च दर्जाची महाविद्यालये आहेत, पाहुयात या महाविद्यालयांची थोडक्यात माहिती..!

सद्यःस्थितीत पुणे शहरात फर्ग्युसन (एफ. सी.), सर परशुरामभाऊ (एस.पी.), मराठवाडा मित्र मंडळ, (एम. एम. सी.सी.), बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बी. एम. सी. सी.) आणि आबासाहेब गरवारे (गरवारे कॉलेज) ही पाच सर्वांत जुनी व मोठी महाविद्यालये आहेत. या सर्वच महाविद्यालयांची स्थापना एका विशिष्ट हेतूने करण्यात आलेली आहे. या महाविद्यालयांमधून पारंपरिक विद्या शाखांसह विविध व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही चालविण्यात येत आहेत. या महाविद्यालयांमधील वेगळ्या शिक्षण पद्धतीविषयीची कॉलेजनिहाय माहिती पुढीलप्रमाणे

1) फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
फर्ग्युसन महाविद्यालय ही स्वायत्त सार्वजनिक शैक्षणिक संस्था आहे. या महाविद्यालयात प्रामुख्याने कला आणि विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम शिकविले जातात. हे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डी.ई. एस.) या संस्थेचे कॉलेज आहे. ते स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १८८५ ला स्थापन झालेले आहे. कॉलेजने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करूनही दशकभराचा कालावधी लोटला आहे. यंदा या कॉलेजच्या स्थापनेला १३४ वर्षे पूर्ण होत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महाविद्यालयाचे संस्थापक आहेत. प्रो. वामन शिवराम आपटे हे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, जे. बी. कृपलानी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राम गणेश गडकरी, इरावती कर्वे, पंजाबराव देशमुख, र. धो. कर्वे आदींसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, माधव गाडगीळ, आर्या आंबेकर आदी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. या महाविद्यालयाने कौशल्य विकास आणि नवसंशोधन केंद्र (centre for skill devlopment and inovation) सुरू केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.

2) सर परशुरामभाऊ महाविद्यालय
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची स्थापना १९१६ मध्ये झालेली आहे. या महाविद्यालयाचे जुने नाव न्यू पूना कॉलेज असे होते. परंतु जमखंडी राज्याचे राज्यकर्त्याने त्यांचे वडील परशुराम पटवर्धन यांच्या स्मरणार्थ कॉलेज दोन लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर या महाविद्यालयाचे नाव सर परशुरामभाऊ महाविद्यालय असे करण्यात आले. हे कॉलेज एस. पी. कॉलेज म्हणून परिचित आहे. ब्रिटिश गर्व्हनर लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते या महाविद्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही पारंपरिक विद्या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय संगणकशास्त्र (कॉम्प्युटर) आणि व्यवस्थापन (बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) या विद्या शाखांचे अभ्यासक्रमही चालविले जातात. सर्व शाखांमध्ये इयत्ता अकरावीपासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध आहे. याशिवाय सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक ऍक्‍टव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

3) मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज
मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय हे वाणिज्य शाखांमधील अभ्यासक्रमांसाठीचे नामवंत महाविद्यालय आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन जिमखाना येथे कॉलेज असून ते "एमएमसीसी' या नावाने परिचित आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण हे या महाविद्यालयाचे संस्थापक आहेत. या कॉलेजची स्थापना १९८६ मध्ये झालेली आहे. मराठवाडा मित्र मंडळ विश्‍वस्त संस्थेचे हे कॉलेज आहे. या संस्थेने आता अन्य विविध शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध असलेले अन्य काही स्वतंत्र महाविद्यालयेही सुरू केले आहेत. यामध्ये विधी, पत्रकारिता, व्यवस्थापन, परकीय भाषा, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आदी प्रमुख शाखांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. समुपदेशन, प्रशिक्षण आणि नोकरीची हमी देणारे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

4) बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेज 
बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हेही डेक्कन एज्युकेशन सोसायटीचेच कॉलेज आहे. हे फक्त वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम उपलब्ध असलेले कॉलेज आहे. तसं हे कॉलेज म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाचे लहान भावंड आहे. कारण फर्ग्युसन महाविद्यालयात वाणिज्य अभ्यासक्रमांची सोय उपलब्ध नसल्याने, डेक्कन एज्युकेशन सोसायटीनेच १९४३ मध्ये हे कॉलेज सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती सायरस पूनावाला, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आदी नामवंत व्यक्ती या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गर्व्हनर प्रो. डी. जी. कर्वे हे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.

5) आबासाहेब गरवारे कॉलेज
आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे दोन स्वतंत्र भाग आहेत. महाविद्यालयाचे नाव एकच मात्र अभ्यासक्रम वेगळे असलेले हे दोन भाग आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी स्वतंत्र असलेल्या आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचा आणि कला व विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र असलेल्या आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालयाचा समावेश आहे. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये त्या त्या शाखेचे पदवीपूर्व, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध आहे. आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना १९४५ मध्ये तर गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना १९६७ मध्ये झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हे महाविद्यालय आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News