शिरूर मतदारसंघात प्रचार जोरात चुरस वाढली

नितीन बारवकर
Wednesday, 24 April 2019

शहरी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक ते वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण बांधव आणि दुर्गम भागातील आदिवासी, अशा संमिश्र रचनेच्या शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी चेहरा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरस आहे. दोन्ही बाजूंच्या तडाखेबंद यंत्रणेमुळे ‘काँटे की टक्कर’ आहे.
नितीन बारवकर

तडाखेबंद प्रचाराने जबरदस्त चुरस    

शिरूर - बैलगाडा शर्यतीभोवती फिरणाऱ्या शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा विविध विषय अग्रस्थानी आहेत. साठ टक्के ग्रामीण आणि चाळीस टक्के शहरी, अशा या मतदारसंघात मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या आदिवासी पाड्यांबरोबरच आयटीपासून बकालपणात भर टाकणाऱ्या पंचतारांकित एमआयडीसीचाही अंतर्भाव होतो.

शिवरायांचा शिलेदार’ हे बिरूद लावूनच शिवाजीराव आढळरावांनी तीन निवडणुका जिंकल्या. या वेळी ‘शिवरायांचा सच्चा मावळा’ म्हणत डॉ. अमोल कोल्हेंनी भावनिक साद घालून ‘एन्ट्री’ केल्याने चुरस वाढलीय. रिंगणात २३ उमेदवार असले, तरी लढत सरळच आहे.

शिरूर मतदारसंघाचे आढळरावांनी तीनदा नेतृत्व केलेय. विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीतील आढळरावांसमोर राष्ट्रवादीने चाणाक्षपणे डॉ. कोल्हेंच्या रूपाने भेदक गोलंदाज दिलाय. डॉ. कोल्हे लोकप्रिय असले, तरी त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. 

तर डॉ. कोल्हेंच्या पक्षांतरामुळे इरेला पेटलेल्या शिवसैनिकांना भाजप कार्यकर्त्यांच्या बूथनिहाय यंत्रणेचे बळ मिळाले आहे.राज्यातील प्रचार संपल्याने मुख्यमंत्री फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्या तोफा येथे धडाडतील. त्याने मोठी राजकीय घुसळण होईल, हे खरेच.

उमेदवारांची बलस्थाने
शिवाजीराव आढळराव पाटील
खासदारकीची तिसरी टर्म, दांडगा जनसंपर्क
संसदेत प्रभावी कामगिरी, मतदारसंघातही कामे
भाजपच्या तीन आणि शिवसेनेच्या दोन आमदारांचे पाठबळ

डॉ. अमोल कोल्हे
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्या भूमिकांमुळे लोकप्रिय,    स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समितीतील पक्ष पदाधिकाऱ्यांचे पाठबळ
मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जाळे
एकाच उमेदवारामुळे निर्माण झालेली ‘अँटी इन्कम्बन्सी’

मतदारसंघातील प्रश्‍न
महामार्गांवरील वाहतूक कोंडी
 पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम
 औद्योगिक पट्ट्यातील कायदा व सुव्यवस्था
  धरणाच्या पाणीवाटपातील विस्कळित नियोजन
 वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News