घरांसह सार्वजनिक इमारतींना एकच रंग; प्रबोधनात्मक संदेशांना चित्रांचीही जोड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • अनेक हटके उपक्रमांद्वारे नेहमीच चर्चेत राहणारी पाटण तालुक्‍यातील मान्याचीवाडी आता गुलाबी बनली आहे.
  • गावच्या एकीचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. 

ढेबेवाडीः अनेक हटके उपक्रमांद्वारे नेहमीच चर्चेत राहणारी पाटण तालुक्‍यातील मान्याचीवाडी आता गुलाबी बनली आहे. गावातील प्रत्येक घर गुलाबी रंगाने रंगवून त्यावर प्रबोधनात्मक संदेश आणि चित्रे रेखाटल्याने तेथील भिंतीही बोलक्‍या झाल्या आहेत. गाव पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्यांना प्रबोधनाबरोबरच गावच्या एकीचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. 

स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तंटामुक्ती, पंचायत राज अभियान आदी उपक्रम आणि स्पर्धांमधून यशस्वी सहभाग घेऊन 54 हून अधिक पारितोषिकांची मानकरी ठरलेली मान्याचीवाडी नवनवीन संकल्पनाद्वारे राज्यासह देशाला परिचित झाली आहे. घर तिथे मुऱ्हा म्हैस, सोलर व्हिलेज, मृत व्यक्तींच्या नावाने वृक्षारोपण, अंगणवाडीपासून प्राथमिक शाळा डिजिटल, पाण्याचे एटीएम, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी होणारी ग्रामपंचायतीची शंभर टक्के करवसुली, गावातील सार्वजनिक निर्णय ग्रामसभांमध्ये आदी कितीतरी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे हे गाव आता गुलाबी बनल्याने सर्वांच्याच औत्सुक्‍याचा विषय बनले आहे. गावातील प्रत्येक घर गुलाबी रंगाने रंगवून त्यावर प्रबोधनात्मक संदेश आणि चित्रे रेखाटण्यात आल्याने शाळेप्रमाणेच आता घरांच्याही भिंती बोलक्‍या झाल्या आहेत. 

या गावात 212 मिळकती असून, त्यांच्यासह सार्वजनिक विहिरी, शाळा, अंगणवाडी, पार, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे आदींनाही गुलाबी रंगाने रंगविण्यात आले आहे. पेंटरची टीम त्यासाठी महिनाभर राबत होती. सुमारे तीन हजार लिटर रंगाचा त्यासाठी वापर झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, किरण साईमोते, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, प्राचार्य यू. टी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, सदस्य लता आसळकर, पूनम माने, संगीता माने आदींसह ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. 

एकीचे दर्शन 
विविध उपक्रम पाहण्यासाठी मान्याचीवाडीत राज्यभरातून अधिकारी, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहली येतात. त्यांना प्रबोधनाबरोबरच गावच्या ऐक्‍याचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली. स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री जन्माचे स्वागत, साक्षरता आणि आरोग्यविषयक जागृती करणारे संदेश आणि चित्रे प्रत्येक घरांच्या भिंतीवर रेखाटली असून, प्रेरणेचे प्रतीक असलेल्या या रंगामधून प्रबोधनाबरोबरच गावच्या एकीचेही दर्शन घडत असल्याचे सरपंच रवींद्र माने यांनी या वेळी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News