आदिवासी आश्रमशाळांना पूर्वीप्रमाणे धान्य वितरित करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव

सुशांत ज. कांबळे, जनसंपर्क अधिकारी
Friday, 9 August 2019
  • आदिवासी अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा हा पुरवठा विभागामार्फत पूर्वीप्रमाणे वितरित करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश...
     

मुंबई: महाराष्ट्र राज्यात आदिवासी अनुदानीत आश्रमशाळांना धान्य पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अडचणी बाबत राज्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला. यावेळी प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, सह सचिव सुपे, अन्न नागरी पुरवठा विभाग, उप सचिव लक्ष्मण ढोके, अनुदानीत आश्रमशाळा संघटनेचे पदाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात कल्याणकारी संस्थांमार्फत एकूण ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येत असून त्यापैकी ५८ प्राथमिक, ३३२ माध्यमिक व १६६ आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. सदर आश्रमशाळांमध्ये एकूण २,४८,८६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्र शासनामार्फत पूर्वी अशा अनुदानीत शाळांना बीपीएल दराने अन्न पुरवठा करण्यात येत होता.

तथापि, केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, धान्य व सार्वजनिक वितरण विभागाच्या दि.१७.०३.२०१९ च्या पत्रान्वये दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने फक्त शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या फक्त शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहे यांना धान्याचे वाटप करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले असल्याची माहिती सह सचिव श्री.सुपे, अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी बैठकीच्या वेळी दिली.

कल्याणकारी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असल्याने यामधील विद्यार्थ्यांना अन्न धान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक असल्याचे अनुदानीत आश्रमशाळांच्या पदाधिकारी यांनी आपले मत मांडले.

विद्यार्थ्यांना बिपीएल दराने अन्न धान्य पुरवठा सुरळीत वितरित व्हावा यासाठीचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत केंद्र शासनास पाठविण्याबाबची लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला राज्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News