युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात महाविद्यालयीन युवकांचे प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • उपराजधानीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींचे प्रमाण मोठे आहे.
  • देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असून, पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना सहज उपलब्ध होत आहेत. 

नागपूर - उपराजधानीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींचे प्रमाण मोठे आहे. विशेषत: उच्चभ्रू वर्गात व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. युवा पिढी तसेच उच्चभ्रू समाजात व्यसनांकडील ओढा वाढला आहे. शिवाय व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्‍स वाटते, ताण-तणाव कमी होतो, असेही गैरसमज आहेत.

देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असून, पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना सहज उपलब्ध होत आहेत. 
महाविद्यालय परिसरात विशेषत: अभियांत्रिकीसारख्या महाविद्यालयांजवळ अमली पदार्थ उपलब्ध होत असले तरी उघडपणे विकले जात नाही. विकत घेणारा विकणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो. मोमिनपुरा, हसनबाग, ताजबाग, सदर, मानकापूर, धरमपेठ, एमआयडीसी, बजेरिया, रेल्वेस्थानक परिसरात ग्राहकी मोठी असल्याने विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याची पोलिसांची माहिती आहे. 

पाकिस्तान, नायजेरिया, नेपाळ आदी देशांमध्ये गर्द तयार होते. विशाखापट्टणम, आदिलाबाद, उडिशातील संबलपूर, अंगूल, ढेकनाल, बलंगीर या भागात गांजा व चरसचे तर मराठवाडातील काही जिल्ह्यातही चोरून अफूचे उत्पादन घेतले जाते. रेल्वे व रस्ते मार्गाने ट्रक, बस वा इतर वाहनांमध्ये इतर मालांच्या आड दडवून अमली 

अनेक विद्यार्थी आहारी
ब्रेडला आयोडेक्‍स लावून खाण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. खोकल्याचे औषध अधिक प्रमाणात घेतले जाते. मॅन्ड्रेक्‍सच्या गोळ्या खाल्ल्या जातात. सोल्युशन, थीनर, व्हाइटनर आदींचा नशेसाठी वापर केला जातो. उपराजधानीत आबू शेख सर्वांत मोठा ड्रग्स तस्कर असून, त्याने अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी नेले आहे.
पदार्थ आणले जातात. शहरात अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा व गर्द (मॅफेडोन, हेरॉईन किंवा ब्राऊन शूगर) विकले जाते.  

व्यसनामुळे तरुणाई सैरभैर
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती एकलकोंड्या असतात. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांचा संवाद नसतो. काही ना काही कौटुंबिक समस्या त्यांना असतात. अमली पदार्थांमधील काही द्रव्यांमुळे व्यक्तीला वेगवेगळे भास होतात. त्याला आपण ‘हॅल्युसिनेशन’ असे म्हणतो. हे भास इतके तीव्र स्वरूपाचे असतात की, त्यामुळे हे पदार्थ सेवन केलेली व्यक्ती सैरभैर होते. काही ‘स्टिम्युलन्स’ असे असतात की, त्यामुळे त्या व्यक्तीला आपण हवेत तरंगत आहोत, असे वाटते आणि त्यामुळे या अमलाखाली असताना या व्यक्ती उंचावरून खाली उडी मारतात आणि स्वत:चा जीव गमावतात.

७४ लाखांचा  मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १ जानेवारी ते २४ जून २०१९ पर्यंत ६१ गुन्हे नोंदवून ७४ लाख १३ हजार ४६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ४३ गांजाच्या गुन्ह्यात २९१ किलो १५४ ग्रॅम गांजा, हेरॉईनच्या ५ गुन्ह्यांत ४६ ग्रॅम हेरॉईन, चरसच्या एका गुन्ह्यात ११५ ग्रॅम चरस जप्त केले. याशिवाय मेफिडोनच्या १२ गुन्ह्यांत ७९ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून २४ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थविरोधी पथकाने जुलै २०१७ ते २४ जून २०१९ या काळात ४०७ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ४ कोटी ५७ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News