मुलगी दाखवण्याचा कार्यक्रमात 'मुझे छोटीवाली पसंत है!' अस का होतं

हेमंत जुवेकर
Sunday, 23 June 2019

तरुणीकडे पाहून एक तरुण आपल्या मित्राच्या कानात कुजबुजतो, ‘शी इज हॉट’; पण इतक्‍या जोराने की अखंड लिफ्ट त्याच्याकडे वळून पाहते. तेवढ्यात त्याचा मित्र त्याच्या कानात तेवढ्याच जोराने कुजबुजतो, ‘इडियट’

व्हीसीआर आठवतोय कुणाला? आणि व्हिडीओ कॅसेट? काहींना व्हिसीआर म्हणजे काय ते कळणारही नाही. काहींना व्हिडीओ कॅसेट आठवेल; पण खूप जणांना कॅसेट म्हणजे काय हे कळणार नाही. पण ज्यांना ते कळेल त्यांना आठवतील त्यासोबत जोडलेले अनेक बरेवाईट किस्से... भाड्याने आणलेला व्हिडीओ कॅसेट प्लेअर (ज्यांच्या घरी ब्लॅक-व्हाईट टीव्ही होता त्यांनी त्यासोबत आणलेला रंगीत टीव्हीही) आणि एका रात्रीत पाहिलेले तीन तीन सिनेमा... त्यातला तिसरा सिनेमा संपता-संपताना पहाट व्हायची.

पण अनेकदा तो इतका झोपेत पाहिला जायचा की त्या सिनेमातले काही सिन्स नकळत पहिल्या दोन सिनेमांत मिक्‍स व्हायचे. ती व्हिडीओ कॅसेट कधी अडकायची, कधी दुमडायची, कधी चित्र न दिसल्याने त्याची ऑडिओ कॅसेटही व्हायची! पण या साऱ्यावर मात करून सिनेमा पाहायचा उत्साह ओसांडायचाच त्या वेळी. वाढदिवस, सत्यनारायणाची पूजा किंवा तसलंच काहीतरी निमित्त काढून सिनेमा जागरण नाईट साजरी केली जायचीच.

काही काळानंतर अधिक चांगलं चित्र दाखवणारी सीडी आली आणि नंतर आली त्याहून उत्तम दिसणारी डीव्हीडी. यांचे प्लेअर मग इतके स्वस्त झाले की घरोघरी दिसायला लागले. त्यामुळे ती एका रात्रीत जागरण करून तीन-तीन सिनेमा पहाण्याची गंमत संपली. (आणि तिसऱ्या सिनेमाची स्टोरी कोण बरोबर सांगतो यातली स्पर्धाही!) त्याच काळात गोदरेजच्या डीव्हीडीची एक जाहिरात आली होती. त्यावेळी ब्रॅण्डेड आणि नॉनब्रॅण्डेड प्लेअर्सच्या गर्दीत आपले वेगळेपण ठसवण्यासाठी गोदरेजला आपल्या डीव्हीडीला इनबिल्ट ॲम्प्लिफायर असल्याचा मुद्दा ठसवायचा होता. 

आज डीव्हीडी प्लेअर कुठे दिसतही नाहीत. पण गोदरेजच्या डीव्हीडी प्लेअरची ती जाहिरात मात्र अजूनही आठवेलच बहुतेकांना. कदाचित त्यापैकी काहींच्या आठवणी थोडा धक्का-स्टार्ट कराव्या लागतील. त्यासाठीचा हा धक्का.

एक आजी आपल्या नातीला झोपवताहेत. प्रचंड मोठ्या (आणि प्रचंड बेसूर) आवाजात अंगाईगीत गाऊन. तेवढ्यात ‘पोस्टमन’चा पुकारा करत एक पोस्टमन येतो; तर त्याला आजीबाई कितीतरी मोठ्याने ‘शू...’ करून शांत राहायला सांगतात...

बसमधून प्रवास करणारा एक तरुण. अचानक मोठमोठ्याने गुणगुणू लागतो. इतक्‍या मोठ्याने की पुढच्या सीटवर बसलेला गृहस्थ कानातले हेडफोन काढून त्याच्याकडे वळून पाहतो.

लिफ्टमधून जाताना सोबत उभ्या असलेल्या तरुणीकडे पाहून एक तरुण आपल्या मित्राच्या कानात कुजबुजतो, ‘शी इज हॉट’; पण इतक्‍या जोराने की अखंड लिफ्ट त्याच्याकडे वळून पाहते. तेवढ्यात त्याचा मित्र त्याच्या कानात तेवढ्याच जोराने कुजबुजतो, ‘इडियट’.मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतक्‍यात नवरा मुलगा आपल्या आईच्या कानात तसाच जोराने कुजबुजतो, ‘मुझे छोटीवाली पसंत है...’हे काय चाललं आहे त्याचा उलगडा त्या जाहिरातीच्या शेवटी होतो... तिथे निवेदक सांगतो, ‘सबका व्हॉल्यूम उँचा कर दे, बिल्टइन ॲम्प्लिफायरवाला गोदरेज डीव्हीडी प्लेअर!
      
त्या जाहिरातीमुळे, त्या ‘आवाज वाढव’ म्हणण्याची गरज नसलेल्या प्लेअर्सची विक्री किती वाढली हे नक्की आठवत नसलं, तरी तिने जाहिरात विश्वातली क्रिएटिव्हीटीची उंची नक्कीच वाढवली होती, हे मात्र नक्की आठवतंय. कारण त्या जाहिरातीने त्यावेळी जाहिरातीसाठी असलेले अनेक पुरस्कार पटकावले होते.  
आज या जाहिरातीच्या निमित्तानं अनेकांना त्यांचं बालपण, किशोरपण सहजपणे आठवलं असेल. काहींच्या आठवणी धक्का-स्टार्ट झाल्या असतील... काहींच्या या जाहिरातीमुळे, काहींच्या डीव्हीडीमुळेड तर काहींच्या व्हिडीओ कॅसेटमुळे!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News