"आरटीईची" प्रक्रिया बारगळली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातून तीन हजार ९० पालक ‘आरटीई’च्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत आहेत.

औरंगाबाद - मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातून तीन हजार ९० पालक ‘आरटीई’च्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत आहेत. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पालकांसमोर मुलांच्या प्रवेशाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आधीचे प्रवेश निश्‍चित करून पुढील फेरी न घेतल्यास पालकांचा रोष वाढणार आहे. 

दरवर्षी आरटीईची प्रक्रिया मे महिन्यात संपते. यंदा पहिल्यांदाच शासनाने राज्यस्तरावरून ही प्रक्रिया राबविली; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आरटीई प्रक्रिया यंदा खूपच रखडली असून, अद्याप जिल्ह्यातून फक्त अडीच हजार प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तीन हजार ०९० जागा म्हणजे ६५ टक्के जागा रिकाम्या आहेत. यावर्षी प्रथमच पडताळणी समितीमार्फत कागदपत्रे तपासणी सुरू केली होती. यामध्ये पहिल्या फेरीसाठी तीन हजार ८३९ प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली होती; मात्र समितीतील सरकारी आडमुठेपणामुळे फक्त अडीच हजार प्रवेश निश्‍चित झाले. तर एक हजार ३३७ प्रवेश अपूर्णच राहिले. 

पुढील आठवड्यात शाळा सुरू होत असून, बहुतेक शाळांच्या खुल्या जागा भरून झालेल्या आहेत; परंतु आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या १५ हजार पालकांना अजूनही प्रवेशाची आशा आहे. पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, या भीतीने पालकांना खासगी शाळांत ॲडव्हान्स रक्कम भरण्याची वेळ आली आहे. हे शुल्क परत मिळेल याची शाश्वती नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News