हजर व्हा नाहीतर कारवाई होणार प्रज्ञासिंह यांना न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • गैरहजर राहिल्यास कारवाईचा विशेष न्यायालयाचा इशारा

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपी व भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारीही विशेष न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला हजेरी लावली नाही. त्यामुळे उद्या (ता. ७) त्यांनी न्यायालयात हजर राहावे, अशी ताकीद न्यायालयाने दिली. गैरहजर राहिल्यास योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

खटल्याची सुनावणी सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. खटल्यातील तीन आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; मात्र सुनावणीला आठवड्यातून किमान एक दिवस आरोपींनी हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.

लोकसभेची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सुनावणीला हजर न राहण्याची परवानगी त्यांच्या वतीने मागण्यात आली होती; मात्र ही मागणी विशेष न्या. विनोद पडळकर यांनी अमान्य करत त्यांना गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु, भोपाळमध्ये प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, असे प्रज्ञा यांच्या वतीने ॲड. प्रशांत मगू यांनी सांगितले. 

सुरुवातीपासूनच धार्मिक सबबी
बॉम्बस्फोट प्रकरणातील अन्य एक आरोपी सुधाकर द्विवेदी यानेही सुनावणीस गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला आहे. जम्मू-काश्‍मरमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जायचे आहे, सुटीच्या हंगामामुळे ३० जूनपर्यंत तिकीट मिळणार नाही, असे कारण त्याने सांगितले. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली.

खटल्याच्या सुरुवातीपासून आरोपी धार्मिक कार्यक्रमांच्या सबबीवर मुदत मागत आहेत. त्याला तिकीट मिळते की नाही, हे पाहणे न्यायालयाचे काम नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News