प्रियांका गांधींना अटक !

सकाळ (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • सोनभद्रला पीडितांना भेटण्यापासून रोखले
  • रस्त्यावर ठिय्या आंदोलन​

लखनौ/नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष प्रियांका गांधी यांना शनिवारी अडविण्यात आले. पीडितांच्या नातेवाइकांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा घेत प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

सोनभद्र येथील घोरावाल भागातील जमिनीच्या वादातून बुधवारी सरपंच यज्ञदत्त याच्या समर्थकांनी गोंड जमातीतील व्यक्तींवर गोळीबार केला. यात दहा जण ठार झाले. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी या आज सोनभद्र येथे गेल्या होत्या.

प्रियांका गांधी यांनी वाराणसी येथे जाऊन रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची भेट घेतली. यानंतर सोनभद्रला जात असताना वाराणसी- मिर्झापूर सीमेवर त्यांना अडविण्यात आले. भाजपच्या दबावाखाली झुकणार नाही. सोनभद्रमधील घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भेटण्यात काय गैर आहे, असा प्रश्‍न करीत प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर धरणे धरले. त्यांना जवळील चुनार विश्रांतिगृहात नेण्यात आले.

या घटनेचे राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिसाद उमटले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना बेकायदा अटक केली असून, सरकार लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. 

चौकशी समिती स्थापन
सोनभद्र हत्याकांडप्रकरणी मोठा वाद सुरू झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी याप्रकरणी पीडितांना न्याय देण्याचे आश्‍वासन देत उपविभागीय दंडाधिकारी व अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगितले. आतापर्यंत सरपंच यज्ञदत्त व त्याच्या भावासह २९ जणांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून, दहा दिवसांत ती अहवाल देणार आहे, अशी माहिती आदित्यनाथ दिली.

‘प्रियांका गांधींना सरकार घाबरते’
मुंबई : भाजपचे सरकार काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना घाबरते, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकारला टोमणा लगावला.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आज येथे जोरदार निदर्शने केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे काही दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून दहा लोकांची हत्या झाली. प्रियांका गांधी यांनी सोनभद्रला भेट देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांकांच्या वाहनांचा ताफा अडवून त्यांना ताब्यात घेतले. हे वृत्त समजताच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना केलेली अटक बेकायदा असल्याची टीका थोरात यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News