दुष्काळात खासगी सावकार वाढले

तात्या लांडगे
Monday, 1 July 2019
  • संख्या ४१५ ने वाढली : दोन हजार कोटींचे कर्जवाटप

सोलापूर  : कमी पाऊस, दुष्काळ, कर्जमाफीची प्रतीक्षा, एफआरपीची प्रतीक्षा, बॅंकांच्या खेटा अशा कारणांनी जगाचा पोशिंदा संकटात सापडला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह व शेतीकामांसाठी बळिराजाची पावले खासगी सावकारांच्या दाराकडे वळली. या पार्श्‍वभूमीवर राज्यात २०१८-१९ मध्ये ४१५ खासगी सावकारही वाढले आणि मागील चार वर्षांमधील सर्वाधिक दोन हजार कोटींचे कर्जवाटप झाल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने कर्जमाफी करूनही मागच्या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे कर्ज फेडायलाही पैसे नव्हते. त्यातच कारखान्यांकडील उसाची रक्‍कम असो की शासनाकडील मदतीची प्रतीक्षा करावी लागली.

बॅंक खाते थकबाकीत गेल्याने बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळेना, शेतीची मशागत, खते, बियाण्यांसाठी पैसे नाहीत. या पार्श्‍वभूमीवर बळिराजाची पावले परवानाधारक खासगी सावकारांच्या दाराकडे वळू लागल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. दुष्काळ, शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा यासह अन्य संधीचा फायदा घेत परवानाधारक खासगी सावकारांची संख्या वाढू लागली आहे. 

शासनाने टक्‍केवारी निर्धारित केली असतानाही वाढीव टक्‍केवारी अथवा चक्रवाढ व्याज घेण्याचे प्रकारही सुरू आहेत. मागील साडेचार वर्षांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातून जमिनी बळकाविल्याच्या १९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राज्याची स्थिती |२०१५| २०१६| २०१७ |२०१८|
खासगी सावकार १२,०२२ १२,२०८ १२,२१४ १२,६२९
कर्जदार ७,०४,४५२ १०,५६,२७३ १०,९५,७०१ १८,९७,००२
कर्ज (कोटींमध्ये) ८९६.३४ १२५४.९७ १६१४.८० २०१७.३७

सोलापूर शहर व जिल्ह्यात सुमारे बाराशे परवानाधारक खासगी सावकार आहेत. चक्रवाढ व्याज घेतले, पैसे देऊनही जमीन परत केली नाही, अशा तक्रारी वाढत आहेत. 
- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News