घराची शान! आरामाचं निधान!!

माधवी सटवे
Wednesday, 10 April 2019

आम्ही परळहून पार्ल्याला राहायला आलो तेव्हा अमच्याकडे जेमतेम गरजेपुरत्या वस्तू होत्या. मोजून ४ वाट्या ४ भांडी. तशीच एखाद दोन दूध आमटीची पातेली, १ कढई वगैरे... एक उन्हाळा तर पंख्याशिवाय काढला होता... अर्थात हे आईकडून कळलेलं ... ३-४ वर्षाच्या वयाला पंख्याचं स्तोम कळत नाहीच!!

आम्ही परळहून पार्ल्याला राहायला आलो तेव्हा अमच्याकडे जेमतेम गरजेपुरत्या वस्तू होत्या. मोजून ४ वाट्या ४ भांडी. तशीच एखाद दोन दूध आमटीची पातेली, १ कढई वगैरे... एक उन्हाळा तर पंख्याशिवाय काढला होता... अर्थात हे आईकडून कळलेलं ... ३-४ वर्षाच्या वयाला पंख्याचं स्तोम कळत नाहीच!!

पण इतक्या कमी सामानाबरोबरच आमच्या घरात मनाने विराजमान झालेल्या ३ गोष्टी- माझ्या अक्षरशः पोतभर बाहुल्या ,एक फोल्डिंग लाकडी पलंग आणि २ आराम खुर्च्या!!

दोन लाकडी फ्रेमच्या रोझवूड पॉलिश असलेल्या ऐसपैस अशा सीट आणि पाठीला प्लास्टिक केन असलेल्या आरामखुर्च्या... मोठ्या, थोड्या थोराड अंगयष्टी असलेल्या माणसालाही मांडी घालून ऐसपैस बसता येईल अशा!!...त्यांच्या हात विश्रांती ही इतक्या रुंद की आणि परफेक्ट कोन साधत जास्तीत जास्त आराम मिळेल अशा !!

आराम खुर्ची म्हणजे काय....तर तिचा पाठीचा कोन बरोबर इतकाच की पूर्ण पाठीला आराम देईल...ना जास्त ना कमी....त्यातून पटकन उठता यायला हवे...उठताना अंगांचे वेगवेगळे कोन करत धडपडत उठावे लागले तर केलेला आराम त्यातच खर्च होईल की!!

त्यांच्या फ्रेम मजबूत लाकडी होत्या पण पाठ आणि बैठकीला केन असल्याने हवेशीर होत्या. कितीही गरम होत असेल तरी त्यावर मात्र आराम वाटे!

आम्ही लहान असताना आई बाबाच त्यावर बसत असतील ...पण आम्ही मोठं झाल्यावर मात्र त्यांच्यावर बसण्यासाठी दोघांत भांडणे व्हायची!!...तोपर्यंत एका खुर्चीच्या केनने अगदीच राम म्हंटल होतं.. त्यावर जाजम घडी करून टाकून काम चालत होतं. पण तरी मूळ खुर्चीची मजा नव्हतीच!!...त्यामुळे एकच खुर्ची अख्या घराची 'go to place' होती!! आई स्वयंपाक घरात काम करून दमली की दोन मिनिटं विसाव्याला हिच्याच कडे!....बाबा ऑफिसहून ट्रेनच्या चेंगराचेंगरीमधून आले की फ्रेश होऊन हिच्याचकडे आराम व्हायचा त्यांचा!!

आम्ही दोघे तर काय जेव्हा घरी असू त्याच्यावरच असायचो...इतकंच काय तर आमचे मित्र मैत्रिणीही घरी आले की ह्या वर बसण्यासाठी चढाओढ लागत असे!
आमच्या दोघांची ह्या खुर्चीवर बसण्यासाठीची भांडणे शेवटी इतकी विकोपाला जायची की शेवटी एकदा टीव्ही आणि आरामखुर्चीवर बसणे ह्याची सांगड घालून आम्ही वेळा ठरवून घेतल्या होत्या!!....त्यातही बरेचदा भाऊ त्याचे शक्तिप्रदर्शन करें आणि मागून खुर्ची कलंडून मला बेघर करत असे!!

विचार केला तर ह्या खुर्च्या माझ्या पणजोबांच्या काळातील तरी नक्कीच असतील...अंगावर रोमांच उभे रहातात...तरुणपणी एवढी विचारांची पोच नव्हती..आता विचार केला तर ज्या माझ्या पणजोबांना मी कधी पाहिलही नाही ते त्यावर डोळे मिटून आराम करतायत...आयुष्याच्या संध्याकाळी घडून गेलेल्या घटनांचा मागोवा घेतायत, असं दृश्य डोळ्यासमोर येतं आणि मन भरून येतं. त्या खुर्च्यांवर बसून आईशी केलेली अनेक हितगूजं... बाबांशी मारलेल्या गप्पा ... रात्री दिवे मालवून आई बाबांसोबत ऐकलेली जुनी हिंदी गाणी!..भावाशी त्यावरून केलेली भांडणं... सगळं आठवतं आणि पुन्हा त्या खुर्च्या घरी आणाव्या अशी तीव्र इच्छा होते!...

मुंबईतलं आमचं घर दोन खणी त्यात एवढ्या ऐसपैस खुर्च्या कशा राहातील... नव्याची नवलाई ओसरली की अडचण होईल असे अनेक तर्क करत अजूनही त्या खुर्च्या घरी आलेल्या नाहीत!!

कालौघात ह्या फर्निचर चे केन बदलणारे कारागिरही नाहीसे झालेत...पूर्वीचे कारागीर असं मजबूत काम करत, ते आता दिसत नाही...आता अनेक फर्निचर च्या दुकानात विचारून झालं ... कोणी केन बदलणारे आहे का..अजूनही ठोस माहिती मिळत नाहीये...त्यामुळेही त्या खुर्च्या भावाच्या पुण्याच्या घरी माळ्यावर पडल्यात!...

परवापासून खूप जास्त ताप आहे. अंगदुखीही खूपच...डोळे बंद केले की त्या खुर्च्याच डोळ्यासमोर येताहेत ..आईच्या साडीच्या केलेल्या झोळीत कसं बाळ अल्लद राहातं तसच वाटेल त्या खुर्चीत हे नक्की!!
आता आई नाही... बाबाही नाहीत...आईचा मऊ मायेचा प्रेमळ स्पर्श...बाबांचं न चुकता अंगावर पांघरूण घालणं... आजारपणात फार आठवतं... वाटतं... ते सगळे स्पर्श ती सगळी माया ह्या खुर्च्यांनी सांभाळली असेल आपल्यात...मी बसले की गोंजारेल मला तशीच...अंगदुखी कुठल्याकुठे पळून जाईल!!

मनाशी नक्की केलंय आता...त्या खुर्च्या आणायच्याच !..परंपरागत पिढीजात ठेवा पुढच्या पिढीकडे मायेने ,मानाने ,गौरवाने सुपूर्द करायचाच..ह्या खुर्च्या ....जणू घराची शान! आरामाचं निधान!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News