सध्याचे सरकार हे सामान्य नागरिकांविरोधी - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • श्रीमंतांना करमाफी आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आरोप

नवी दिल्ली : केरळमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित करून काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आज सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. श्रीमंतांना करमाफी आणि शेतकऱ्यांच्या भरपाईत अनंत अडचणी, अशी अवस्था असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला दीर्घकाळ राज्य करणारे सत्ताधारी जबाबदार असल्याचा पलटवार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला. सोबतच भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे उत्पन्न २५ टक्‍क्‍यांनी वाढल्याचाही दावा केला. 

नव्या लोकसभेत राहुल गांधींनी प्रथमच शून्य काळात बोलताना शेतकरी आत्महत्येच्या निमित्ताने केंद्रीय अर्थसंकल्पावरही टीका केली. शेतकरी प्रचंड अडचणीत असून, याकडे मी सरकारचे लक्ष वेधू इच्छितो. मात्र, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अर्थसंकल्पात काहीही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वायनाडमध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली. तब्बल आठ हजार शेतकऱ्यांना बॅंकांची नोटीस मिळाली आहे, तर काही शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्यामुळेही आत्महत्या वाढल्या आहेत. बॅंकांनी शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटिसा पाठवून त्रास देऊ नये, यासाठी  रिझर्व्ह बॅंकेला सरकारने आदेश द्यावेत, अशीही मागणी राहुल यांनी केली. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना शेतमालाला दरवाढ, कर्जमाफी यांसारखी आश्वासने दिली होती. परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली नसल्याचा दावा राहुल यांनी केला. राहुल गांधींचे आरोप राजनाथसिंह यांनी खोडून काढले. 

कठोर आर्थिक निर्णय घ्या : चिदंबरम
‘आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,’ अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर हल्ला चढवला.

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना चिदंबरम यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करताना सत्तारूढ नेतृत्वाच्या अर्थधोरणावर हल्ले केले. पाच लाख कोटी डॉलरचे व्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणे ही सध्याच्या स्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्वाभाविक प्रक्रिया असेल, जर अर्थधोरणे जागरूकपणे राबवली तर, असे सांगून ते म्हणाले, की मात्र हे स्वप्न दाखवण्यासाठी पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांची काय गरज आहे? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News