प्रेमाच्या शब्दांना सोबत घेऊन...

पद्मश्री डॉ.गणेश देवी, अध्यक्ष राष्ट्र सेवा दल
Sunday, 18 August 2019

 भास्करराव दुर्वे या व्यक्तीचं शतकानंतरचं स्मरण त्याच व्यक्तीच्या मृत्युनंतर यावर्षी आपण करतो आहोत. त्यांचा जन्म झाल्यानंतर साधारण अठ्ठावीस ते तीस वर्षानंतर भारत हा स्वतंत्र झाला आणि नंतर संविधानावर आधारित लोकशाही मानणारं राष्ट्र झाले. आणीबाणीनंतर त्वरितच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनात, साधारणपणे अठ्ठावीस ते तीस वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडात, तीन दशके भारताच्या नवीन राष्ट्राच्या उभारणीची वर्षे होती. त्यावेळचा समाज वेगळा होता. त्यावेळेस नवीन आकांक्षा घेऊन भारताचे तेव्हाचे चाळीस कोटी नंतर मग हळूहळू वाढत त्यांच्या मृत्यूपर्यंत पासष्ट कोटी झाले होते.

 भास्करराव दुर्वे या व्यक्तीचं शतकानंतरचं स्मरण त्याच व्यक्तीच्या मृत्युनंतर यावर्षी आपण करतो आहोत. त्यांचा जन्म झाल्यानंतर साधारण अठ्ठावीस ते तीस वर्षानंतर भारत हा स्वतंत्र झाला आणि नंतर संविधानावर आधारित लोकशाही मानणारं राष्ट्र झाले. आणीबाणीनंतर त्वरितच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनात, साधारणपणे अठ्ठावीस ते तीस वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडात, तीन दशके भारताच्या नवीन राष्ट्राच्या उभारणीची वर्षे होती. त्यावेळचा समाज वेगळा होता. त्यावेळेस नवीन आकांक्षा घेऊन भारताचे तेव्हाचे चाळीस कोटी नंतर मग हळूहळू वाढत त्यांच्या मृत्यूपर्यंत पासष्ट कोटी झाले होते. नव्या आकांक्षा होत्या-- खेड्याचा विकास होईल, प्रत्येकाला शिक्षण मिळेल, प्रत्येकाला अधिकार असेल प्रत्येकाचं मत जरूर पडल्यास राष्ट्रपतीपर्यंत पोहचू शकेल--असा विश्वास तेव्हा होता. ते राष्ट्र आणि आत्ताचं राष्ट्र यात जमिन अस्मानाचा फरक आहे.  जेव्हा आपण जन्मशताब्दी वर्ष साजर करतो तेव्हा ते साजरे करण्यामागचा हेतू आपल्यापुढे आलेली आव्हान आपण कशी पेलू शकू, त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वसुरींच्या स्मृतीमधून प्रेरणा-स्फूर्ती मिळेल त्याचं चिंतन करण्याचा असतो.

जगभर फक्त आपल्या पद्धतीने विचार करणारी लोकं थोडी अल्पमतात आलेली आहेत. ही गोष्ट खरी आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना असं वाटतंय आपली ताकद कमी होत चाललीय. आपण कुठेतरी थोड्याश्या मर्यादित जागेत जखडले जातोय. याच्यावर बरेच उपायही आपल्याजवळ आहेत. नेहमी आपण एक दुसऱ्याशी बोलत असताना  ते व्यक्त करत असतो. आपण काही वेळेला म्हणतो आपल्यात खूप फाटाफूट झाली म्हणून आपण इथे आहोत किंवा राजकारणात पैशाचा खूप वापर होतो, पण आपण तो करत नाही म्हणून आपण मागे आहोत. आपण अनेक कारणांचा शोध घेतो. आणि त्या त्या संदर्भात ती ती कारण प्रमाणात योग्यच आहेत.

नेहमीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेतच. ती उत्तरं आणि तेच प्रश्न मी मांडायचा प्रयत्न करणार नाही. मी थोडासा वेगळा प्रश्न मांडतोय. तो असा आहे की गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांमध्ये संपूर्ण जगभर नवे विचार येत गेले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे विचार आले. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या उत्तरार्धात मार्क्सवादी विचार ज्यात आर्थिक समानता आणि त्यासाठी जरुरी असलेली राष्ट्रीय नियंत्रण नीती कशी असावी? स्टेट-स्ट्रक्चर कसं असावं? हा विचार आला. वेगवेगळ्या विचारांचे समुदाय-संघटना त्या दिशेने कार्यरत झाल्या होत्या.  आफ्रिके मधल्या, आशियामधल्या अनेक देशांमध्ये स्वातंत्र्याचे लढे सुरु होत होते. त्या लढयांमध्ये हे विचार रुजले गेले. गेल्या दोनशे अडीचशे वर्षांमध्ये जे देश युरोपियन देशांचे गुलाम होते .फक्त आपला भारत देशच नाही असे अनेक देश, ते विसाव्या शतकाच्या दुसऱ्या उत्तरार्धात दुसऱ्या पन्नास वर्षात स्वतंत्र झाले. एकंदरीत विसाव्या शतकात दुसऱ्या उत्तरार्धात जगभर स्वातंत्र्याचा माहोल होता.१९५० ते साधारणपणे १९७५ ही वर्षे ज्या महात्म्याच्या स्मृतीसाठी आपण इथे जमलोय त्यांच्या कर्तुत्वाच्या उभारीची वर्षे होती. 

समानता ही कल्पना स्वातंत्र्याच्या कल्पनेत समाविष्ट होती.  त्या दोन कल्पना स्वतंत्र करून दाखवण शक्य नव्हते. कारण जिथं जिथं राज्यघटना निर्माण झाल्या, तिथं तिथं नागरिकाची व्याख्या करण्यात आली. एकंदरीत, जगभर समानतेचं वारं  होत, राज्यघटनेने बांधलेले समाज जगभर समान होते. त्यांच्या राज्यघटना अजूनही आहेत. ते देश अजूनही देश आहेत. आणि तिथे आजही आपण नागरिक आहोत असं लोकांना वाटतंय. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या पन्नास वर्षामध्ये जगभर स्वातंत्र्य, लोकशाही, समानता ही विचारधारा विस्तारली. ही अनेक लोकशाही देशाच्या नागरिकांनी स्वीकारली. असं जर होत तर मग गेल्या पंधरा वीस वर्षात जगभर असं काय घडलं ज्याच्यानंतर इतर अनेक देशातले नागरिक काही वेगळं बोलू लागले? मी भारताविषयी बोलण्यासाठी म्हणून भारताबाहेरच्या काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतो.  असं काय घडलं की जगातल्या इतर अनेक देशातले नागरिक हा स्वातंत्र्याचा समानतेचा हक्कांचा विचार सोडून कुठल्यातरी वेगळ्या-वाकड्या रस्त्याने निघालेत?  तुम्हाला एक उदाहरण देतो. २७ एप्रिल २०१९ रोजी इटलीमध्य एक विपरीत घडलं. २७ एप्रिल हा तो दिवस आहे ज्यादिवशी मुसोलिनीला फाशी दिलं गेलं. मुसोलिनी हा फॅसिस्ट हुकुमशहा. याने हिटलरच्या बरोबर येऊन विध्वंसक युध्द तर केलीच पण माणसांना अमानुषपणे मारलं. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पसमध्ये लाखो लोकांची कत्तल करण्यात आली. त्याच्यापासून मुक्ती मिळाली तो दिवस इटलीमध्ये एक स्वातंत्र्य दिनासारखा,जसा आपल्याकडे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी उत्साहाने साजरा होतो. त्यादिवशी मीलान शहरात मुसोलिनीला फाशी दिली गेली होती. त्या शहरात फॅसिस्ट तरुणांनी मुसोलीनीचे पोस्टर हातात धरून मोठी परेड काढली आणि त्याला फासिस्ट-परंपरेचा सॅल्युट केला. 

त्यानंतर स्पेनमध्ये निवडणुका झाल्या आणि तिथं नोंद्पात्र संख्येने अतिउजवे प्रतिनिधी त्याठिकाणी निवडून आले. त्यांच्या मदतीशिवाय स्पेनमध्ये सरकार बनवण अशक्य बनून गेले. त्यांनतर सहा आठवड्यापूर्वी युरोपमध्ये निवडणुका झाल्या. संपूर्ण युरोप एकत्र आणण्याचं एक स्वप्न होत. देशाच्या पलिकडे जाऊन मानवता धर्म सगळ्यांनी स्वीकारून, देशातील अर्थ-व्यवस्था आणि समाज-संरचना उभी करण्याचं स्वप्न!  त्या युरोपच्या कल्पनेला विरोध करण्यासाठी म्हणून परत एकदा युरोपियन देशाच्या अनेक उजव्या शक्ती एकत्र येऊन त्यांची एक आघाडी बनवली गेली. आणि त्यांना ६८ जागा युरोपच्या पार्लमेंटमध्ये मिळाल्या. जे पारंपारिक उजव्या विचारसरणीचे पण लोकशाहीला स्वीकारतात त्यांच्या जागा कमी झाल्या; त्याचबरोबर ज्यांना आपण ‘डावे’ म्हणतो त्याच्या जागा अजूनही कमी झाल्या. पण अजून एक वेगळी घटना तिथे घडली, ती अशी घडली की ग्रीन-पार्टीच्या जागा वाढल्या. आपण फक्त युरोपपुरतंच बोलू. पारंपारिक डाव्या विचारसरणीचे आणि पारंपारिक उजव्या विचारसरणीचे पक्ष तिथल्या राजकारणातून सरत चालले असे दिसते. त्यांच्या जागी एक अतिरेकी विचार मानणारी आणि मनुष्याचा तिरस्कार करणारी अशी पार्टी पुढे आली. दुसऱ्या बाजूला संपूर्ण पर्यावरणाला सांभाळणारी आणि माणसांवर प्रेम करणारी अशी पार्टी वर येत चाललीय हेही दिसते. त्यातही पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या पक्षाला तिरस्कार करणाऱ्या पक्षापेक्षा जास्त मते मिळाली, युरोप-पार्लमेंटच्या जागा मिळाल्या, यातून काहीतरी आपल्याला समजण्यासारखं आहे. पण ते समजण्यासाठी यापूर्वीच्या राजकीय परिभाषेत काही नोंद्पात्र बदल घड्तायेत ते ध्यानात घ्यायला पाहिजे. 

विसाव्या शतकात आपली आणि आपल्यासारख्या अन्य संस्था, व्यक्ती, पक्ष, देश यांची भाषा बहुतांशी 'सहानुभूतीची' होती. गेल्या तीस वर्षामध्ये १९९० नंतर उदारीकरणाची आर्थिक नीती आल्यानंतर, आपली मदतीची-भाषा सहानुभूतीची-भाषा, आर्थिक सक्षमीकरणाची-भाषा ही तुमच्यामाझ्या सारख्याच्या तोंडून काढून घेण्यात आली. अर्थात, आपण जे शब्द वापरतो ते आपण वापरत होतोच; आपली गाणी होती, आपली नाटकं होती, आपली पुस्तके-प्रकाशने होती, आपले सिनेमे होते. आपले ग्रुप्स होते, आपल्या कॉन्फरन्सेस-चर्चासत्रे-शिबिरे होत होती, आपल्या सभा होत होत्या. पण ज्यांच्यासाठी आपण हे शब्द वापरत होतो त्यांना ते शब्द फिके वाटायला लागले होते. हे आपल्या ध्यानात यायला हवे होते, ते तितकेसे स्पष्टपणे आपल्या ध्यानात येत नव्हते. 

 इलेक्शनच्या वेळेला टॅक्सीमधून मला एक बिहारी मुलगा घेऊन जात होता. मी त्याला विचारलं ‘तुझ्या भावाला नोकरी आहे का?’ तो म्हणाला ‘नोकरी नाही.’ ‘मत कुणाला देणार?’ म्हणाला, ‘मोदीजीको.’ मी म्हणालो ‘तुला नोकरी नाहीये तेव्हा अशा सरकारला मत दे की जे तुला नोकरी देईल.’ ‘नही, वो देश की शान बढा रहे है।’ ह्या बाबतीत तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आपल्या प्रत्यक्ष घरातले लोकंसुद्धा काहीतरी मुग्ध झालेले आहेत. शान किंवा प्रतिष्ठा! देशाची प्रतिष्ठा! यात घडलं असं की आपण सगळ्यांना सांगत होतो (मी सोप्या शब्दात सांगतोय) की ‘तुम्ही गरिबी मिटवा’. ‘श्रीमंतांचा पैसा काढून घेऊन गरिबांना द्या’  ‘श्रीमंतांची संपत्ती काढून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणारं राज्य आम्ही निर्माण करू. त्याच्यासाठी तुम्ही मदत करा.’ उजव्या लोकांनी एक वेगळं अपील, एक वेगळं वचन द्यायला सुरुवात केली. ते वचन असं होत की “तुम्ही फक्त गरीब आणि त्यांची आर्थिक, सामाजिक समानता ह्याविषयी कशाला बोलता? आम्ही एक प्रचंड मोकळी जागा, अवकाश निर्माण करणार आहोत. तो अवकाश आहे ऍस्पिरेशनचा, आकांक्षांचा. तुमच्या कितीही आकांक्षा असतील तरी पुऱ्या होतील अशी बाजार-मोकळीक असणारे जग आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. त्यात श्रीमंत आहेत ते अजून श्रीमंत होतील. तुम्ही गरीब आहात तुम्हीपण श्रीमंत व्हा. आम्ही सगळं श्रीमंताचं जग बनवतो आहोत. राज्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी फक्त एवढीच. अशाप्रकारचे कायदे बनवायचे की त्याच्यामधून गरिब श्रीमंत बनतील आणि श्रीमंत अजून श्रीमंत होतील.” गरिबांना आकर्षित करणारी एक नवीन रंगी-बेरंगी आणि कमालीची कर्कश भाषा त्यांनी वापरली.

कार्ल मार्क्सच्या वेळेस जी भाषा होती, गांधीजींच्या वेळेस जी भाषा होती त्यापेक्षा ही एक वेगळी नवीन भाषा समाजातल्या काही लोकांना आकर्षित करण्यासाठी माध्यमांच्या जल्लोषात निर्माण करण्यात आली. आपल्या देशामध्ये २०१४ ला निवडणुका झाल्या तेव्हा जे पंतप्रधान झाले त्यांचा सगळ्यात मुख्य मुद्दा कुठला होता तर तो होता विकास. ते म्हणत, “मी तुम्हाला विकास देतो; फक्त मी तुम्हाला विकास देऊ शकतो. मला नमन करा."  त्या आभासी आकर्षणाचे परिणाम आपण पहातो आहोच. पण विकासाचा त्यांचा तो अर्थ --प्रत्येकाला आपण अदानी आणि अंबानी बनवू अशी फक्त स्वप्न पुरवायची. ही फक्त त्यांची पद्धत नाहीये. हीच पद्धत ट्रम्पची आहे. हीच पद्धत मॅक्रोनची आहे. हीच पद्धत जगभर वापरली जात आहे. गरिबी ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी बदलून टाकला.  गांधी गरिबाला देव मानायचे. साने गुरुजी गरिबाला मित्र मानायचे.  अति -उजव्या अर्थकारणात, आणि त्यात पेरलेल्या भ्रांतीमय विकासाच्या परिभाषेच्या परिणामाखाली समाजातले अनेक वर्ग स्वतःचा, गरिबांचा, वंचितांचा तिरस्कार करायला लागलेत. 

जेव्हा राजेशाही व्यवस्थेतून लोकशाही व्यवस्थेकडे जग सरकत गेलं, तेव्हा नागरिक ह्या शब्दाचे काही विशिष्ट् अर्थ निर्माण झाले होते. नागरिक या शब्दाचे तेव्हाचे अर्थ राज्यव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट फ्रेमवर्कमध्ये गुंफले गेले होते. पण हळूहळू एन्लायटन्मेंट टप्प्याच्या सुरुवातीपासून ते विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या शब्दाचा अर्थ ‘व्यक्ती’ या स्वरुपात जास्त रुळत गेला. प्रत्येकजण स्वतःला ‘मी व्यक्ती आहे’ हे जास्त मानत गेला. आणि ‘मी समाजाचा हिस्सा आहे’ ही भावना त्या प्रमाणात कमी होत गेली. आपण जर गेल्या दोन-तीन दशकातील जगभरच्या आंदोलनांचा इतिहास बघितला, भारतातली आणि भारताबाहेरची जी आंदोलनं यशस्वी झाली आणि जी आंदोलनं अयशस्वी झाली असे ढोबळ दोन वर्ग जर आपण केले, तर ज्या आंदोलनांमध्ये व्यक्तीचा व्यक्ती म्हणून अधिकार शाबूत होता त्याला जास्त स्वीकृती मिळाली असे दिसेल. आणि ज्या आंदोलनांमध्ये व्यक्तीचा समाज म्हणून चेहरा पुढे मांडला गेला ती आंदोलनं ज्या प्रमाणात यशस्वी व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात यशस्वी झाली नाहीत असेही दिसेल. उदाहरण: समलैंगिक स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचं आंदोलन, त्यांचा मानव म्हणून, माणूस म्हणून स्वीकार करण. त्या आंदोलनाच्या शेवटी त्याना व्यक्तीस्वातंत्र्य जास्त मिळण हे पदरात पडलं. हे आंदोलन ज्यावेळी होत होत त्याचं वेळेस आपल्या सगळ्या वर्कर्स युनियन फुटल्या. कारण असं होत की, त्या आंदोलनांमध्ये आपण ज्यांना आणायला बघत होतो त्या व्यक्तींच्या डोळ्यातच व्यक्ती ही समाजापेक्षा जास्त महत्वाची असायला पाहिजे हि दृष्टी निर्माण होत होती. अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला काय करायला लागेल?

डेमोक्रसी अथवा लोकशाही शब्दाचा अर्थही बदलत गेला. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकं राज्य व्यवस्थेला दिशानिर्देश देऊ शकायचे की लोकांच्या भल्यासाठीचे नियम तुम्ही बनवा. पण आता जगभरच्या लोकशाह्या काहीतरी एका आवर्तनात सापडलेल्या आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधतायत.  प्रजेच्या भल्याचा विचार राज्यव्यवस्थेने करायचा नाही तो स्वतः प्रजेने करायचा, व्यक्तींनी करायचा अशी धारणा दृढ बनत चाललीय. अशा परिस्थितीमध्ये  नवी लोकाभिमुखी आंदोलनं उभी करताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एकत्र यायला लागणार आहे  समविचाराच्या लोकशाही मानणाऱ्या, स्वातंत्र्य मानणाऱ्या, विवेक मानणाऱ्या अनेक संघटनांना, अनेक राजकीय पक्षांशी सुद्धा आपल्याला संभाषण सुरुवात करायला पाहिजे, त्यांना संवादात सहभागी करायला पाहिजे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र आणावं लागेल. जगभरच्या अनेक राजकीय पक्ष, समविचारी संस्था आणि व्यक्ती, विचारक, कलाकार, शास्त्रज्ञ आणि विचारवंत, अशा अनेकांना एकत्र आणावे लागेल. ते काम करण्यासाठी सध्या भारतात राष्ट्र सेवा दल ही अत्यंत सुयोग्य संघटन-संस्था आहे आपण जर एकमेकाचा तिरस्कार करत राहिलो तर संपून जाऊ शकतो, पण एकत्र आलो तर जग बदलू शकतो 

सर्व विरोधी पक्षांच्या मध्ये पडझड सुरु असताना राष्ट्र सेवा दलाला एका दीपस्तंभासारखं उभं राहणं गरजेचं आहे आणि हे कार्य आपण करू शकतो माझा यावर विश्वास आहे. पण त्याच्या काही शर्ती आहेत. फार दोन चांगली माणस दोन वेगवेगळ्या गावांमध्ये अत्यंत छोट्या स्केलवर काम करत असतील तर ती दडपली जाऊ शकतात. पण ती दोघ जेव्हा एकत्र येतात तेव्हा दडपण्याची प्रक्रिया थोडी क्षीण बनते,आणि असे अनेक एकत्र आले तर दडपणाऱ्याला  ते  परतवू  शकतात.  आपली, राष्ट्र सेवा दलाचा विचार किंवा त्याच्याशी मिळता जुळता विचार स्वीकारणाऱ्यांची, व्याप्ती वाढवली पाहिजे, ज्याच्यामुळे त्यातली प्रत्येक व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष ही जास्त सक्षम सुदृढ बनू शकेल. 

एकोणिसाव्या शतकामध्ये युरोपने आपल्याला विचार दिला. विसाव्या शतकात आपण थोडेसे त्यांच्या बरोबरीने गेलो. एकविसाव्या शतकामध्ये आपली १४० कोटी लोकसंख्या असेल. सध्या, ती १३६ कोटी आहे. जगातल्या ८५० कोटी लोकसंख्यापैकी १४० कोटींचा आपला देश म्हणून आपल्या देशावर ही जबाबदारी आहे की आता आपण जगाला नवा विचार द्यायला पाहिजे. कुठूनतरी आपल्यासाठीचा नवा विचार रेडिमेड स्वरूपात येईल अशी आशा बाळगून वाट पाहत राहणे हे आपल्यासाठी विघातक ठरेल. आणि ह्या देशामध्ये एका विकृत विचारसरणीच्या विरुद्ध उभी राहणारी शक्ती जिच्यात आहे ती राष्ट्र सेवा दल ही संघटना आहे. म्हणून देशाचे,जगाचे डोळे आपल्याकडे लागलेले असतील. त्या अपेक्षेला किंचित तरी आपण पुरे पडू कमीत कमी इतकी आपण स्वतःची क्षमता वाढवायला पाहिजे. ती तुमच्या सर्वांच्या मदतीने, आणि आपल्या सतत वाढत राहणाऱ्या विचारांच्या परिपक्वतेतून, नव-नवीन प्रश्न उपस्थित करून नवीन उत्तरं शोधण्याच्या जिज्ञासेतून, अनेक चळवळीतून आणि निष्ठेतून तशा प्रकारची विश्वासार्हता आपण निर्माण करू शकतो. 

आपल्यापुढे आज वेगळी आव्हाने आहेत. आपल्याला नानांनी जि प्रेरणा दिली ती गांधी, बुद्ध, मार्क्स, आंबेडकर यांची प्रेरणा आहे. साने गुरुजींची प्रेरणा आहे.त्यांची मात्र नक्कलच केली तर तो त्यांचा अपमान असेल. जर आपण मात्र वरकरणी गांधीजींसारखं वागायला लागलो तर गांधीजींचा अपमान होईल. केवळ ‘बुद्ध’, ‘बुद्ध’ असं मी म्हणत राहिलो तर तो बुद्धावर केलेला फार मोठा अन्याय होईल. पण बुद्धांनी त्यावेळेस ज्याप्रकारे धार्मिक धर्मांधतेला टक्कर दिली होती, गांधीनी ज्याप्रमाणे जगातल्या सगळ्यात महाबलाढ्य रचना असलेल्या ब्रिटिश राज्याला टक्कर दिली होती, त्यातून प्रेरणा घेऊन आजच्या काळासाठी, आजच्या समाजाच्या परिवर्तनासाठी पुन्हा नव्या प्रकारे काम केले तरच ते बुद्ध, मार्क्स, गांधींचा वारसा चालवण्याचे काम असेल. राष्ट्र सेव दल आणि समविचारी संघटनांचं अनेक पातळीवरचं, अनेक फ्रंटवरचं रोज नवं आंदोलन सुरु असण जरुरी आहे. आपल्यापैकी हजारो जणांची जरूर पडल्यास तुरुंगवास भोगण्याचीही तयारी असली पाहिजे. स्व, संस्था आणि पदे यांचा मोह सोडून, आपल्या दाही-दिशांनी गांजलेल्या समाजाचा पुन्हा विचार करणे हे जरुरी आहे. ती तयारी असल्यास आहे ही वस्तुस्थिती आपण बदलू शकतो. 

 जेव्हा इलेक्शन सुरु होते तेव्हा तिरस्काराचे शब्द सगळीकडे येत होते.  माझ्या मनात असा विचार आला कि हिंसेचे शब्द वाढत असतील तर प्रेमाचे शब्द कमी होत असावेत, ते तसे होता-आहेत का ते अभ्यापूर्ण रीतीने तपासून पाहावे. म्हणून मी देशभरातील भाषांचा अभ्यास करणाऱ्यांना पत्र लिहीलं “तुमच्या भाषेत प्रेमाचे शब्द काय, किती आहेत ते मला पाठवा.” मला अनेक ठिकाणांहून शब्द आले. आपल्या देशातील अस्तित्वात असलेल्या सातशेहून अधिक भाषांत मिळून नऊ हजार प्रेमाचे शब्द अजूनही वापरात असल्याचं आढळलं. एका बाजूला भारतातली कोट्यावधी माणस जि नऊ हजार प्रकारे प्रेम व्यक्त करू शकतात; आणि दुसऱ्या बाजूला ह्या तिरस्कार करणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या, सोशल मीडियावर मुस्कटदाबी करणाऱ्या टोळ्या(ट्रोल्स)! यातले खरोखर कोण आजच्या भारतीय समाजाचे वास्तव प्रतिनिधित्व करतात? 

तेव्हा मला चार्ल्स डार्विनने मांडलेला मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत आठवला. एखादा प्राणी उत्क्रांतीच्या विशिष्ट् स्थितीमध्ये असताना एखाद्या विशिष्ट् अवयवाचा त्याग करतो कारण त्याचा उपयोग संपलेला असतो. उदा. वाघांची जशी नखं असतात तशी एकेकाळी माणसांची सुद्धा होती. पण ती गेली. अन्य हिंस्त्र जनावरांप्रमाणे दाताचे सुळे होते. ते उत्क्रांतीच्या ओघात गेले. जनावराची प्रत्येक प्रजाती उत्क्रांतीत त्यांचे निरुपयोगी गुणधर्म व अवयव असतात ते टाकून देण्याची गरज निर्माण होते. तो उत्क्रांतीतील टर्निंग पॉईंट येतो, तेंव्हा तो प्राणी तो ते गुणधर्म व अवयव अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापरतो, ज्यामुळे तो गुणधर्म/अवयव बोथट होतो. आत्ताचा तिरस्कार, राग, घृणा याचा मोठ्या प्रमाणावर जगभर जो वापर चाललेला आहे तो कदाचित त्यांचा शेवटचा अविष्कार ठरू शकतो. प्रेमाचे नऊ हजार प्रेमाचे शब्द लोकं प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरतात. त्यांची जागा अजूनही अढळ आहे. साने गुरुजींनी सगळ्यात खरा धर्म कोणता आहे हे सांगताना 'प्रेम' हा कालातीत महत्वाचा शब्द वापरला होता. भारतातला विविधतेने सजलेला विस्तृत समाज तो शब्द आजही विसरलेला नाही. प्रेम हाच खरा धर्म! याच्यापेक्षा मोठं अध्यात्म जगात येशू ख्रिस्ताकडे नव्हत, बुद्धाकडे नव्हत, कृष्णाकडे नव्हत ! 

व्यक्तिवाद कितीही फोफावला तरी जोपर्यंत प्रेमाचे नऊ हजार शब्द देशात आहेत तोपर्यंत तिरस्काराच्या राजकारणाचा नवा पायंडा फार काळ चालणार नाही. भारतीय लोकशाहीच्या उत्क्रांतीमध्ये अत्यंत घृणास्पद रीतीने वारंवार वापरला जाणारा तिरस्काराचा प्रकार कदाचित आपण पार करण्याच्या क्षणापाशी आलेलो आहोत अशा विश्वासाने आपल्याला कामाला लागायचे आहे. राष्ट्र सेवा दलाने हे काम पूर्वीपासूनच हातात घेतलय.  ह्या आपल्या सगळ्या कामाला श्रमाला पूर्ण यश मिळो! 
थांबतो.

स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे उर्फ दुर्वे नाना यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्र सेवा दल आणि समविचारी कार्यकर्ता मेळाव्यात संगमनेर जि. अहमदनगर येथे बोलताना राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केलेलं मनोगत...
---------------------------------------------------
भाषणाचे लिखित स्वरूप:  राजा कांदळकर
 ( राष्ट्र सेवा दल पत्रिकेतून साभार ऑगस्ट २०१९ )

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News