बीए करताना या गोष्टी लक्षात घ्या

डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
Friday, 7 June 2019

बीए करताना विविध विषयांतून पदवी घेताना सहजगत्या काय करणे शक्‍य असते, तेवढेच या सदरात पाहणे शक्‍य आहे. मुख्य म्हणजे, एवढे केले तरीसुद्धा नोकरी नावाचे स्वप्न आवाक्‍यात येऊ शकते.

कला शाखेतील विद्यार्थी संख्या सर्वांत जास्त असते, कारण सर्व छोट्या-मोठ्या गावांत पदवीसाठीचा हाच एकमेव रस्ता आहे. अनेक ठिकाणी कॉमर्स आहे; पण ते मराठीतून असते. सायन्स असून नसून सारखेच, कारण त्यासाठी उत्सुक विद्यार्थी बारावीनंतर उपलब्ध नसतात. मात्र, अगदी इंग्रजी विषय घेऊन बीए करणाऱ्यांचे इंग्रजी थक्क करणारे असल्याने किंवा मायभाषा मराठी घेऊन बीए करणाऱ्यांचे मराठीचे अगाध ज्ञान कौतुकास्पद असते. मग बीए करताना विविध विषयांतून पदवी घेताना सहजगत्या काय करणे शक्‍य असते, तेवढेच या सदरात पाहणे शक्‍य आहे. मुख्य म्हणजे, एवढे केले तरीसुद्धा नोकरी नावाचे स्वप्न आवाक्‍यात येऊ शकते.

दैनंदिन वृत्तपत्रांतील मथळे वाचून आवडलेली एखादी बातमी सविस्तर वाचणे, त्याचा संदर्भ लक्षात घेणे, शक्‍य झाल्यास छोटे टिपण तयार करणे. न कळलेली एकतरी बातमी असतेच, ती काय याचा शोध घेणे. गुगलवर न शोधता बातमी का, कशाकरिता, कोणाबद्दल असा शोध घेणे गरजेचे. 

आपले गाव, आपला जिल्हा, त्याचे वैशिष्ट्य याची किमान माहिती असणे अत्यावश्‍यक. सैन्यदल, राज्यसेवा, केंद्रसेवा यांतील कोणत्याही मुलाखतीची सुरवात अशा छोट्या गोष्टींतून होत असते. 

आपण निवडलेला विषय व संबंधित किमान एक जोडविषय याचे अवांतर वाचन केल्यास दुधात साखरच पडते. उदा. इतिहास व समाजशास्त्र. भूगोल व पर्यटन. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र. मराठी व वृत्तपत्रे, नाटक, सिनेमा.

कॉम्प्युटरचे किमान वापराचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे. वर्ड, एक्‍सेल, फोटोशॉप, डीटीपी आल्यास नोकरी नक्की. स्वतःचा टायपिंग स्पीड सांगता येणे फारच गरजेचे.

विचारलेल्या प्रश्‍नाला त्याच भाषेत उत्तर देण्याची सवय लावून घेणे. इंग्रजी प्रश्‍नाचे फक्त उत्तर पूर्ण वाक्‍यात देणारा विद्यार्थी एमए करत असेल, तरी सहज सापडत नाही.

नववीचे मार्क टिकवून पदवी हातात घेणे महत्त्वाचे. प्रथम पदवी घेतानाच्या किमान गोष्टी इथे लिहिल्या आहेत. पदवीनंतरच्या ओघाने येतीलच. सध्या एवढे केले तरी खूप!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News