संभाव्य "आयारामां"मुळे भाजपात अस्वस्थता..! 

प्रवीण जाधव 
Friday, 21 June 2019
  • जिल्ह्यात राष्ट्रवादीतून पक्षांतराच्या चर्चांना जोर; निष्ठावंतांच्या पोटात भीतीचा गोळा 
  • संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना? अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

सातारा: राष्ट्रवादी अंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र, भारतीय जनता पक्षात अस्वस्था पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना? अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकसंधपणे निवडणुकीला सामोरी जाणारी राष्ट्रवादी दिसली; परंतु एक महिना उलटायच्या आतच लोकसभेपूर्वीचे वातावरण जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाले आहे. खासदार उदयनराजेंनी आपल्या मूळ पदावर येत पुन्हा प्रश्‍नांच्या माध्यमातून विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर आरोपाला सुरवात केली. त्या आरोपांना प्रत्युत्तर होऊ लागल्याने राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. 

विकासकामांवर चर्चा करण्याऐवजी ते आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते पुन्हा आरोप- प्रत्यारोपांतच गुंतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना हे आशादायक चित्र वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. संपूर्ण राज्यभर पक्ष मोठ्या संघर्षाला समोरे जात असताना बालेकिल्यातील ही तऱ्हा कार्यकर्त्यांना रूचेना झाली आहे. 

आरोप- प्रत्यारोपांची पातळीही आता बदलत चालली आहे. आतापर्यंत एकमेकांवर आरोप होत होते; परंतु पक्ष सोडून जाण्याची भाषा कोणी करत नव्हते. रामराजे नाईक- निंबाळकर यांनीही खासदारांना आवारा नाही तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असे पवारांना सांगणार असल्याचे म्हटले, तर शिवेंद्रसिंहराजे यांनीही पहिल्यांदाच वेळ आल्यावर विचार करू, असे म्हणत पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला.

जिल्ह्याच्या राजकरणाची धुरा सांभाळणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांनी असे म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच त्यांचे आधीच ठरले आहे, माझे कारण पुढे करू नका, असे म्हणत पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली. प्रत्यक्षात या गोष्टीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, त्यामुळे जिल्ह्यात रामराजे व शिवेंद्रसिंहराजे पक्ष सोडणार या चर्चांना ऊत आला आहे. त्यातून राजकारणाच्या सारीपाटावर कसे फासे पडणार याचेही तर्कवितर्क लढविले जात आहेत.
 
या सर्व प्रकारांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे; परंतु त्यापेक्षाही मोठी अस्वस्था भाजपच्या गोटात पसरलेली आहे. भाजपच्या गोटात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते कधी काळी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे होते. सध्या राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसमध्ये असलेल्यांच्या राजकीय वर्चस्वामुळेच त्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेले आहेत. कधी नव्हे ते त्यांना सत्तेची फळे चाखता येत आहेत. सत्ताधारी म्हणून समाजात वावरता येत आहे. सध्याच्या वर्चस्ववाद्यांशी झगडूनच त्यांनी हे मिळवेल आहे; परंतु ज्यांच्याशी झगडलो तेच आता पक्षात येत असतील तर काय असा प्रश्‍न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे. आयारामांमुळे आपल्याला डावलले जाईल, त्यांच्याच कार्यकर्त्यांचा झेंडा नाचणार या भीतीने निष्ठावंतांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे. 

सातारा व माणमधून आयारामांना विरोध 
प्रामुख्याने सातारा, माण, फलटण मतदारसंघामधील भाजप कार्यकर्त्यांना ही धास्ती अधिक आहे. सातारा व माण मतदारसंघामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयारामांना थेट विरोधाचीही भूमिका घेतली आहे. कोण- कोणत्या पक्षात जाईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच; परंतु पक्षांतराच्या चर्चांमुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ केले आहे हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News