प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही'; फडणवीसांना टोला

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Saturday, 27 July 2019

आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत करून ठेवली आहे.

नागपूर - निवडणुकांसाठी आम्हाला कोणतीही यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत करून ठेवली आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रवी भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ते बोलत होते. यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असे ते म्हणाले.

आघाडीमध्ये वंचितचा समावेश असेल : पवार
वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत १२ ठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साेलापुरात शुक्रवारी सांगितले. पवार म्हणाले, राज्यस्तरावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसाेबत चर्चा सुरू आहे. २८८ जागांच्या वाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचितचे नेते निर्णय घेतील. संबंधित जागेवरील राजकीय ताकद, भौगोलिक स्थिती याचा विचार करून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होणारच आहे, यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी यांना कोणतीही शंका राहण्याचा विषयच नसल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वंचित आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांना गळ घालत आहेत. मात्र, आता या वर १० ऑगस्टनंतरच निर्णय होईल. दुसरीकडे काँग्रेस नेतेही आघाडीमध्ये वंचितमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसकडून ऑफर आली, आत्ता उत्तराची वाट
काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्व वेगवेगळी भाषा बोलते. त्यांच्यातच एकवाक्यता नाही. दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्याचे नेतृत्व कुटुंबवादी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कुटुंबशाहीची आघाडी आहे. त्यांच्या याच कुटुंबशाहीच्या राजकारणामुळे मागील निवडणुकीत त्यांना अपयश आले. काँग्रेसकडून ऑफर आली आहे. पत्रव्यवहारही झाला आहे. आता काँग्रेसच्या उत्तराची वाट असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News