शिक्षण पंढरीचे निष्ठावंत वारकरी : अप्पाराव पाटील

प्रा. डाॅ. मारोती कसाब
Thursday, 11 July 2019

 उदगीर हा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने एक महत्त्वाचा तालुका. याच तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील एक गाव म्हणजे तोंडचिर. बालाघाटच्या खुरट्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं आणि चहूबाजूंनी निसर्ग सौंदर्याने नटलेलं टुमदार खेडेगाव

लातूर जिल्ह्यातील उदगीर हा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने एक महत्त्वाचा तालुका. याच तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील एक गाव म्हणजे तोंडचिर. बालाघाटच्या खुरट्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं आणि चहूबाजूंनी निसर्ग सौंदर्याने नटलेलं टुमदार खेडेगाव. या गावात अठरापगड जातीजमातींची घरं गुण्यागोविंदाने नांदतात.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला मात्र मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या गुलामीत होता, ही बाब काही तरुणांना सहन होत नसल्याने त्यांनी निजामशाही विरुद्ध बंड पुकारले. हे बंड मोडून काढण्यासाठी निजामानेही खेड्यापाड्यात रजाकार पाठविले. त्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून जनतेला हैराण केले. या रजाकारी विरुद्ध लढण्यासाठी तोंडचिर गावात किसनगीर महाराज, दत्तुगीर गुरुजी इत्यादी तरुणांनी "किसान दल" उभे केले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामशाहीतून मुक्त होईपर्यंत किसान दलाने रजाकारांशी कडवी झुंज दिली. याच किसान दलाचे तरुण कार्यकर्ते म्हणून अप्पाराव पाटील यांची कारकीर्द सुरू झाली.

विठ्ठलराव जाधव हे अप्पारावांचे वडील. गावातील एक नेक माणूस. विठ्ठलरावांच्या नावावर पंचवीस एकर जमीन होती. त्यांना दोनच मुलं. अप्पाराव हे थोरले. लहानपणापासूनच किसान दलाचे सक्रिय कार्यकर्ते. त्यामुळे अनेकदा भूमिगत रहात असत. वेश बदलून खेडोपाडी फिरत असत. असेच एकदा फिरस्तीवर असताना कंधार भागातील एका गावात अप्पारावांना राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे दर्शन झाले. गाडगेबाबा यांच्या कीर्तनाचा लाभ झाला.

गाडगेबाबांनी संपूर्ण कीर्तनातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. देव दगडात नाही, तर माणसात आहे. जातीभेद पाळू नका. अंधश्रद्धा बाळगू नका हे बाबांनी सांगितलेले पक्के ध्यानात घेऊन अप्पाराव गावी परतले. तोपर्यंत रजाकारी संपली होती. "जय हिंद" झाले होते. अप्पारावांनी स्वतः शिकायचे ठरवले. त्याकाळी शाळा नव्हत्या. 

तुरळक कोणी तरी शिकलेला असे. अशाच एकाला मास्तर करुन अप्पारावांनी गावात शाळा सुरू केली. गावातील मुलांना शाळेत दाखल केले. दरम्यान अचानक वडिलांचे निधन झाल्याने भावाबहिणींना सांभाळून सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर  घरची जबाबदारी अंगावर पडली. अप्पारावांना शिक्षण अर्धवट सोडून शेती करावी लागली. पण हा मुलगा हुशार आहे हे हेरुन हेरकर गुरुजींनी त्यांना आपला जावाई करुन घेतले व स्वतःची साठ एकर जमीनही त्यांच्या नावची करुन दिली. 
       
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वत्र शिक्षणाची चळवळ सुरू झाली. बापूसाहेब पाटील एकंबेकर , तुकाराम पाटील तादलापूरकर, दत्तुगीर गुरुजी तोंडचिरकर  आदींनी परिश्रम घेत उदगीर येथे "किसान विद्यार्थी वसतिगृह" सुरू केले. त्याचे रुपांतर पुढे किसान शिक्षण प्रसारक मंडळात झाले, तेव्हा अॅड. बळवंतराव  खानापूरकर, अॅड. पी. जी. पाटील, अॅड. सी. पी. पाटील , बाबाराव पाटील शिरोळकर  आणि इतर सहकारी यांच्या सोबत शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अप्पाराव पाटील यांनीही भरीव योगदान दिले. तोंडचिर येथील जिजामाता हायस्कूलच्या उभारणीत अप्पारावांनी हिरीरीने सहभाग घेतला. 

किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी  प्रयत्न केले.  शिक्षणावर त्यांचा गाढ विश्वास होता. खेड्यापाड्यात जाऊन ते लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. तोंडचिर मधील गोरगरिबांच्या मुलांना मदत करण्यासाठी त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दलित वस्तीत जाऊन शिकलेल्या मुलांचे जाहीर कौतुक करीत असत.

गावातील वडार जातसमुहातील एक मुलगा इंजिनिअर झाल्याबद्दल संपूर्ण गावात साखर वाटून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पाटीलकीचा तोरा न मिरवता सर्वांत मिळून मिसळून राहात असल्याने लोकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. गावचे पोस्ट मास्तर म्हणून त्यांनी सेवा केली. कामात कधीही कमीपणा मानला नाही. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावच्या कारभारातही त्यांनी योगदान दिले. हे सर्व करताना त्यांनी घरीही दुर्लक्ष केले नाही. घरातलेकरांवर चांगले संस्कार केले. मुलांना धाकात ठेवून, जीवनमूल्ये शिकवली.

पिढीजात पाटीलकीचा सरंजामी वारसा पुढे चालविण्यापेक्षा आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या जीवनाचे उन्नयन करावे आणि समाजात आदर्श निर्माण करावा असा ध्यासच त्यांनी घेतला होता. "अरे बाबा, आपली शेत जमीन कुठे पळून जात नाही. ती काल होती, आज आहे, उद्याही राहील. पण गेलेली वेळ परत येत नसते ; म्हणून शिका. अभ्यास करुन मोठे व्हा. " , असे ते आपल्या मुलांना सांगत असत. त्यांना तीन मुलं आणि पाच मुली. त्यातील सर्वच उच्च विद्याविभुषित असून, मुलांपैकी एक म्हणजे डाॅ. विनायक जाधव हे गणिताचे मोठे अभ्यासक , संशोधक असून सध्या ते उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत तर दुसरा मुलगा मुक्रमाबाद येथे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक आहे. 

ज्या काळात पाटलाच्या मुलींना घराबाहेर पाऊल टाकायला परवानगी नव्हती, त्याकाळात अप्पाराव पाटील यांनी आपल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज त्यांच्या मुली मोठ्या अधिकार पदावर आहेत. एक शिक्षिका, एक कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व एक मुलगी म्हणजे डाॅ. राजश्री जाधव या अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयक म्हणून त्या विद्यापीठ स्तरावर कार्यरत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून विविध व्याख्यानांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत.

मुलांना आणि मुलींना समानतेने  कसे घडवावे, समाजात कसा आदर्श निर्माण करावा, शिक्षणाचे महत्त्व कसे ओळखावे हे ज्यांच्याकडून शिकावे ते अप्पाराव पाटील ऐंशी वर्षे वयातही शैक्षणिक कार्याला वाहून घेत स्वतः पायी फिरत असत. समाजाला मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत असत. त्यांनी आयुष्यभर कसलीही कर्मकांडे न करता शिक्षण हाच देव मानला.असे शिक्षण पंढरीचे वारकरी अप्पाराव पाटील आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे पुरोगामी विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News