संसारातल राजकारण हे वेगळचं असतं बाबा

अभिनव बसवर
Thursday, 20 June 2019

कधीकधी दोघांमध्ये छोटे मोठे रुसवे फुगवे, वाद व्हायचे ते देखील सांगायची. आई फोनवर सांगेन तसं नात्यात वागायची. आई म्हणाली २ दिवस बोलूच नको तर बोलायचीच नाही. आई म्हणाली संध्याकाळी स्वयंपाक बनवूच नको, बरोबर नवरा वठणीवर येईल, की बनवायचीच नाही......

नवीन लग्न झालं. त्याने भाड्याने फ्लॅट घेतला. आईवडील गावाकडे. राजाराणीचा संसार सुरू झाला. ती नोकरी वगैरे करत नव्हती. त्याने तिला त्याबद्दल सुचवून पाहिलं पण तिला त्यात फारसा रस नव्हता.

रात्री जेवण झालं की तिच्या घरच्यांचा फोन यायचा आणि ती तासंतास फोनवर बोलत बसायची. त्याला आश्चर्य वाटायचं की दररोज नेमकं असं नवीन बोलण्यासारखं असतं तरी काय. सुरुवातीला त्याला वाटायचं की आईवडिलांपासून लांब राहतेय म्हणून होत असेल पण दररोज तेच घडायचं. ती सगळ्या गोष्टी आईला फोनवर सांगायची.

कधीकधी दोघांमध्ये छोटे मोठे रुसवे फुगवे ,वाद व्हायचे ते देखील सांगायची. आई फोनवर सांगेन तसं नात्यात वागायची. आई म्हणाली २ दिवस बोलूच नको तर बोलायचीच नाही. आई म्हणाली संध्याकाळी स्वयंपाक बनवूच नको, बरोबर नवरा वठणीवर येईल, की बनवायचीच नाही.

त्या संध्याकाळी तो ऑफिसमधून वैतागून आला. ऑफिस पोलिटिक्स मुळे त्याला विनाकारण बॉसचा ओरडा खावा लागलेला. इकडे घरात ४ दिवसांपूर्वी झालेल्या छोट्या वादाचा तिने अजूनही अबोला धरलेला. जेवण देखील बनवलं नव्हतं. आधीच मनस्थिती ठीक नसताना भुकेने तो अजूनच चिडचिड करू लागला.

ती देखील उलट बोलायला लागली. तिने बेडरूमचं दार लावून घेतलं आणि झोपून गेली. दुसऱ्यादिवशी तो ऑफिसला निघून गेला. तो जाताच ती माहेरी निघून गेली. याने फोन केले तर उचलेना. शेवटी तो मोठ्या भावाला घेऊन तिच्या घरी गेला.

तिथे तिच्या घरच्यांनी त्याच्यावरच आरोप करण्यास सुरुवात केली. दोघांतील ज्या गोष्टी सांगायला नको होत्या त्या देखील तिने सांगितलेल्या. कोणत्या गोष्टींच स्पष्टीकरण द्यावं त्याला कळेना. आम्हाला विचार करायला वेळ हवाय, त्यानंतर आम्ही आमच्या मुलीला पाठवायचं की नाही ते ठरवू असं म्हणून तिचे आईवडील उठून गेले.

तो घरी आला, भकास घरात एकटाच बसलेला. किचनकट्ट्यावर सगळं खरकटं पडलेलं. राजा राणीच्या संसाराची त्याने पाहिलेली स्वप्ने त्याने त्या खरकट्यासारखी सुपलीत भरण्यास सुरवात केली, डस्टबिनमध्ये फेकण्यासाठी.

टीप- हा एक प्रसंग असून त्यात त्या मुलीच्या व मुलाच्या पात्राबद्दल लिहिलं आहे. सर्व मुलींबद्दल नाही. त्यात कुठेही सर्व मुली अशाच करतात असा उल्लेख नाहीये. व्यक्ती तितक्या प्रकृती. पोस्ट काही वेळासाठी वॉल वर राहील याची कृपया नोंद घ्यावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News