अमित शहांच्या उपस्थितीत 'हे' नेते रविवारी करणार भाजप प्रवेश

सकाळ (यिनबझ)
Friday, 30 August 2019

भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची सांगता येत्या एक सप्टेंबरला सोलपूरला होणार आहे. याचे औचित्य साधून या वेळी भाजपमध्ये मेगाभरती होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.

मुंबई : भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेची सांगता येत्या एक सप्टेंबरला सोलपूरला होणार आहे. याचे औचित्य साधून या वेळी भाजपमध्ये मेगाभरती होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. यानंतर पुन्हा येत्या पाच आणि दहा सप्टेंबरला मेगाभरती होणार असल्याचे सांगण्यात येते. 

लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांना खिंडारे पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसमधून भाजपमध्ये आयारामांनी रांगा लावल्या आहेत. अनेक मातब्बर घराण्यांनी कमळ हाती घेतले असून, अनेक घराणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुलाबाळांसह ‘वेटिंग’वर आहेत. 

भाजप आणि शिवसेनेने आयारामांना पायघड्या घालण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला आहे. शिवसेनेने ‘मातोश्री’वर, तर भाजपने महाजनादेश यात्रेच्या दरम्यान इतर विरोधी पक्षांतील ताकदवर नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचा सपाटा लावला आहे. 

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून घेण्याचा भाजपमधील चाणक्‍यांचा मानस आहे. त्यानुसार इच्छुक नेत्यांशी, विद्यमान लोकप्रतिनिधींशी बोलणी सुरू आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, सातारा जिल्ह्यातील नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सांगली जिल्ह्यातील सत्यजित देशमुख यांचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असल्याचे भाजपमधून सांगण्यात येते.

हे करणार प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

तटकरे पिता-पुत्र शिवसेनेत?
मुंबई : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसणार असून खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे आणि बंधू अनिल तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

त्यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. अवधूत आणि अनिल तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असून पुढील दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News