महाराष्ट्रात राजकीय भूकंप? १० ऑगस्टला आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • विरोधी नेते भाजपमध्ये जायच्या तयारीत
  • भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती

मुंबई, ता. १ ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांची भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानंतर आणखी आठवडाभरात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. येत्या दहा ऑगस्टच्या सुमारास विरोधी पक्षातील आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपचे नेते  सांगत आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक नेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा सुरू झाला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात निराशेचे वातावरण असल्याची चर्चा असली, तरी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद साजरा केला आहे. भाजपात गेलेले नेते सत्तापिपासू असून, ते पक्षातून गेल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात आले. आता भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असून, दहा ऑगस्टला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरवात झाली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच दहा ऑगस्टला भाजपमध्ये आणखी काही नेते पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (३१ जुलै) भाजपमध्ये पहिल्या टप्प्यातील मेगाभरती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपचे कमळ हाती घेतले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
 शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ अमरावती जिल्ह्यातून सुरू झाली आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सत्तेतील दोन्ही पक्ष विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी सरसावले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News