पोलिस पब्लिक स्कूल बंद; पालकांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

स्थानिक पोलिस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर १९ व २० जून रोजी पालक सभा बोलाविली होती.

बुलडाणा - येथील पोलिस पब्लिक स्कूल अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शाळा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी आज पासून पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

स्थानिक पोलिस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर १९ व २० जून रोजी पालक सभा बोलाविली होती. यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून शाळा बंद होत असल्याच्या तोंडी सूचना दिल्या. त्यामुळे या शाळेमध्ये ४ ते ५ वर्षांपासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक अस्वस्थ झाले आहेत. इतर शाळेच्या तुलनेत या शाळेची फी माफक स्वरूपाची आहे. उच्च प्रतीचे शिक्षण देणारी ही शाळा असल्यामुळे असल्यामुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश या शाळेत घेतलेले आहेत.

परंतु कोणत्याही स्वरूपाचा लेखी आदेश न काढता अचानक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथे प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सदर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था व शिक्षण विभाग यांना लेखी आदेश देऊन शाळा कायमस्वरूपी सुरू ठेवावी या मागणीसाठी संबंधित पालकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये नामदेवराव डोंगरदिवे, प्रशांत डोंगरदिवे, राजू गवई, अर्जुन महाजन, सय्यद इसाक, विनोद नाटेकर, गजानन हिवाळे, दिनकर जाधव, बंडू भिसे, सुरेश मोरे यांच्यासह इतर पालकांचा समावेश आहे.

पालकांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
पालकांनी जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांची भेट घेऊन चर्चा केली असता वरिष्ठ पातळीवरून लेखी आदेश आल्याशिवाय अशाप्रकारे अचानक शाळा बंद करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News