पोलिस अन् दरोडेखोरांचा पळापळीचा खेळ रंगला

मंगेश शेवाळकर
Tuesday, 16 July 2019
  • एका ईरटीका कार मध्ये आठ जण थांबल्याचे पोलिसांनी पाहिले.
  • पोलिसांना पाहताच कारमधील सातही जण पळू लागले
  • सुमारे अर्धा तास पोलीस दरोडेखोरांचा पळापळीचा खेळ रंगला होता.

हिंगोली: कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर मोरवाडी शिवारामध्ये मंगळवारी (ता.१६) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व आठ दरोडेखोरांचा पळापळीचा खेळ चांगलाच रंगला. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना जेरबंद करून त्यांच्याकडून दोन चाकू, एक रापी व ईरटीगा कार जप्त केली आहे. मात्र अंधाराचा फायदा घेऊन पाच दरोडेखोर फरार झाले आहेत.

जिल्ह्यातील वाटमारी व जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे पथक जिल्हाभरात रात्रीच्या वेळी गस्त सुरू आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस निरीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, सुनील अंभोरे, आशिष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, भगवान आडे, संदीप जाधव, किशोर कातकडे, किशोर सावंत यांचे पथक कळमनुरी तालुक्यांमध्ये गस्तीवर होते.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर मोरवाडी शिवारामध्ये एका ईरटीका कार मध्ये आठ जण थांबल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांना पाहताच कारमधील सातही जण पळू लागले. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. यामध्ये पोलिसांनी रमेश मनोहर भोसले (रा. कळमनुरी) सचिन गुरुलिंग शिंदे, आकाश गजानन वाघमारे (दोघे रा. वसमत) यांना ताब्यात घेतले. इतर पाच दरोडेखोर मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

सुमारे अर्धा तास पोलीस दरोडेखोरांचा पळापळीचा खेळ रंगला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून दोन मोठे चाकू एक रापी व इतर साहित्य तसेच एक ईरटीगा कार जप्त केली आहे. याप्रकरणी आज पहाटे पाच वाजता कळमनुरी पोलीस ठाण्यात रमेश मनोहर भोसले (रा. कळमनुरी) सचिन गुरुलिंग शिंदे, आकाश गजानन वाघमारे, विलास रमेश शिंदे, कैलास रमेश शिंदे, सुरेश गुरुलिंग शिंदे (सर्व रा. वसमत) जनार्दन मनोहर भोसले (रा. कळमनुरी) व प्रदीप सर्जेराव चव्हाण (रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री खर्डे पुढील तपास करीत आहेत. सदरील आठही जण दरोड्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News