पंतप्रधान नव्या खासदारांना देणार संदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • भाजप संसदीय पक्षाची उद्या पहिली बैठक; पंतप्रधान मोदींच्या संदेशाबाबत उत्सुकता

नवी दिल्ल :  दणदणीत बहुमत मिळवून पुन्हा दिल्लीचे तख्त काबीज केलेल्या सत्तारूढ भाजपच्या संसदीय पक्षाची १७ व्या संसदेतील पहिली बैठक येत्या मंगळवारी (ता. २५) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या व ३०३ खासदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान मोदी भाजपच्या पहिल्यांदा निवडून आलेल्या नवख्या खासदारांना कोणता संदेश देणार, याबद्दल उत्सुकता आहे.

सतराव्या लोकसभेत तब्बल २६७ खासदार पहिल्यांदाच निवडून आले असून, यात भाजपचे बहुसंख्य आहेत. नव्या खासदारांना भाजपच्या वतीने पक्ष म्हणून संसदीय नियमावली व उपस्थितीबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तरुण खासदारांचे संसदेत वेळेवर उपस्थित राहण्याबाबत उदासीन धोरण असल्याचा ‘फीडबॅक’ भाजप नेतृत्वाला मिळाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान स्वपक्षीय खासदारांना ‘अधिवेशन काळात संसदेला विनाकारण दांडी मारू नका,’ असा कडक संदेश देण्याची चिन्हे आहेत.

तोंडी तलाक विधेयकावेळी शुक्रवारी (ता. २१) एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी ऐनवेळी मतविभाजन मागितले तेव्हा भाजपच्या बाकांवर तुलनेने कमी खासदार होते व त्यामुळे सत्तारूढ भाजपची प्रचंड धावपळ उडाली होती. भाजपने त्याची गंभीर दखल घेतली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News