भाजपच्या खासदारांची मोदींनी घेतली शाळा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

‘तुम्ही राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात काय कामे करता, तुम्हाला कोणते छंद आहेत,’ असे विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या तरुण तुर्क खासदारांचा ‘क्‍लास’ घेतला.

नवी दिल्ली : ‘तुम्ही राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात काय कामे करता, तुम्हाला कोणते छंद आहेत,’ असे विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या तरुण तुर्क खासदारांचा ‘क्‍लास’ घेतला.

पंतप्रधानांनी २०१४ पासूनच्या आपल्या पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात प्रत्येक संसद अधिवेशनात राज्यवार खासदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यंदा दणदणीत बहुमताने निवडून आल्यावर त्यांनी महिला, युवा, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय असे गट करून सत्तारूढ खासदरांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रघात सुरू केला आहे. या मालिकेत ते आपल्या निवासस्थानी पक्षाच्या महिला खासदारांशी संवाद साधतील.

१७ व्या लोकसभेत विक्रमी संख्येने म्हणजे ७८ महिला निवडून आल्या आहेत व त्यात भाजपच्या बहुसंख्य महिला खासदार आहेत. मोदी त्यांना कोणता मंत्र देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मोदींनी आज भाजपच्या युवा खासदारांशी संवाद साधला. भाजपच्या व्याख्येनुसार तरुण म्हणजे वय २५ ते ४५ वर्षे असे आहे. या गटातही भाजपचेच खासदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत.

साहजिकच मोदींनी आज युवा खासदारांशी संवाद साधताना अनौपचारिक व हलकेफुलके वातावरण राहील यावर कटाक्ष ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे सर्वांत तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह सुमारे ७५ खासदार उपस्थित होते. राजकारण हा भाजप व साऱ्याच लोकप्रतिनिधींच्या जीवनातील मुख्य व अनिवार्य भाग असला, तरी त्याच्या पलीकडेही जगात बऱ्याच गोष्टी असतात, असे मोदींनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News