निवडणूक एकाच वेळी व्हावी यासाठी पंतप्रधान करणार चर्चा : काँग्रेसचा विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांसह खासदारांशीही बोलणार

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या ‘एक देश एक निवडणूक’ या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बुधवारी (ता. १९) बैठक बोलावली आहे. याच मुद्द्यावर गुरुवारी (ता. २०) सर्व खासदारांशी ते चर्चा करतील. 

पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींनी एकत्रित निवडणुकांसाठी व्यापक चर्चेचे आवाहन केले होते. आताची बैठक त्या दिशेने अंमलबजावणीचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. संसदेचे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलावली होती. या सर्व पक्षीय बैठकीत सरकारने महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी आणि जनतेच्या महत्त्वाच्या प्रस्नांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सहकार्य मागितले.

२०२२ हे स्वातंत्र्याचे ७५ वे असून या वर्षी महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती आहे. या मुद्द्यावर त्याचप्रमाणे एकत्रित निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी संसदेत प्रतिधिनित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमवेत बुधवारी आणि दोन्ही सभागृहांतील खासदारांसोबत गुरुवारी पंतप्रधान चर्चा करतील, असे या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी लोकसभेमध्ये आलेल्या नव्या चेहऱ्यांसोबतच नवा विचारही यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  

चर्चा वादळी होणार? 
एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध दर्शविला असून मागील वर्षी ऑगस्टमध्ये विधी आयोगासमोर हा विरोध मांडताना एकत्रित निवडणुका ही संकल्पना भारतीय संघराज्य भावनेच्या विरोधात असल्याचे काँग्रसने स्पष्ट केले होते. डावे पक्ष, बसप हे एकत्रित निवडणुकांच्या विरोधात असून, केंद्राशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल काँग्रेसचाही पाठिंबा मिळण्याची शक्‍यता अत्यल्प आहे. समाजवादी पक्षाने आधी पाठिंबा दिला असला तरी सध्याची त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. या मुद्द्यावरील चर्चा वादळी ठरू शकते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News