खेळणी विकता विकता त्याने गाठले यशाचे शिखर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • शेख कुटुंबीयांचा गेली 15 वर्षे सण, उत्सव, यात्रा काळात रस्त्यावर लहान मुलांची खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे. 
  • छोटेखानी भाड्याच्या घरात राहणाऱ्या सकलेनची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ना स्वतंत्र अभ्यासाची खोली ना स्पेशल क्‍लास. 
  •  शाळा व व्यवसाय सांभाळात त्याने दहावीचा अभ्यास पहाटे आणि रात्री अशा दोन सत्रांत केला.

साताराः कुटुंबीयांसमवेत साताऱ्याच्या रस्त्यावर चक्र, गदा, तलवार, धनुष्यबाण अशी लहान मुलांची खेळणी विकणाऱ्या सकलेन सलीम शेख याने दहावीच्या परीक्षेत 62 टक्के गुण मिळविले. एका बाजूला व्यवसायाची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची जिद्द ठेवून चिकाटीच्या जोरावर सकलेनने मिळविलेल्या यशाचा आनंद शेख कुटुंबीयांनी बाजारपेठेतील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना सातारी कंदी पेढे वाटून व्यक्त केले. सकलेन हा वर्ये  सातारा येथील जयसिंगराव करपे हायस्कूलमधील विद्यार्थी आहे. शिक्षणाची आस असल्याने तो नेहमी पुस्तकांमध्ये रमायचा. त्याची शिक्षणाची गोडी ओळखून वडील सलीम व आई रबिया यांनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिले.

शेख कुटुंबीयांचा गेली 15 वर्षे सण, उत्सव, यात्रा काळात रस्त्यावर लहान मुलांची खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे. छोटेखानी भाड्याच्या घरात राहणाऱ्या सकलेनची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ना स्वतंत्र अभ्यासाची खोली ना स्पेशल क्‍लास. जो काही अभ्यास करावयाचा तो शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने. अभ्यासाबरोबरच सकलेनला चरितार्थासाठी कुटुंबीयांबरोबर साताऱ्याच्या रस्त्यांवर खेळणी विकावी लागतात. याबरोबरच परिसरातील यात्रा, जत्रांमध्ये खेळणी विकण्यासाठी तो जात असतो. 

शाळा व व्यवसाय सांभाळात त्याने दहावीचा अभ्यास पहाटे आणि रात्री अशा दोन सत्रांत केला. त्याच्या यशाबद्दल रबिया म्हणतात, आम्हाला सकलेनने व्यवसायात मदत करून अभ्यास केल्याचा आनंद वाटतो. त्याच्या वडिलांनी तसेच शिक्षकांनी त्याला घडविले आहे. मित्रांनी आणि मैत्रिणींनी अभ्यासात मदत केली. त्याची आयटीआयचा कोर्स करून नोकरी करण्याची इच्छा आहे. वडिलांचे कष्ट, आईची माया आणि शिक्षकांची पाठीवरील थाप यामुळे दहावी परीक्षेत पास झालो. आयटीआयनंतर चांगली नोकरी करणार असल्याची भावना सकलेनने व्यक्त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News