एका खांबावर द्वारका आणि आण्णा सांगत होते...

साक्षी रामदास साळुंखे, सातारा
Wednesday, 7 August 2019

त्यादिवशी दुपारी शिंदेंच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला ; 'रमा' आणि तिचा भाऊ भांडत होते, अजिबात पटवून घेत नव्हते, अगदी संध्याकाळपर्यंत चालू होती भांडणं. शेवटी रमा चिडून फिरायला बाहेर गेली, जवळच्याच बागेत फेरफटका मारताना तिथे पाहते तर काय तिच्या शेजारचे 'दामू आण्णा' एका बाजूला शांतपणे काही विचार करत बसलेले. तिचं  लक्ष गेलं झालेल्या घटनेला विसरून तिच्या मनात विचार आला की एरव्ही सगळ्यांशी मिळून-मिसळून, आनंदाने बोलणारे 'दामूआण्णा' आज का बरं एवढे शांत? तिला काही राहवेना; ती गेली अन् त्यांच्या जवळ जाऊन बसली.

त्यादिवशी दुपारी शिंदेंच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला ; 'रमा' आणि तिचा भाऊ भांडत होते, अजिबात पटवून घेत नव्हते, अगदी संध्याकाळपर्यंत चालू होती भांडणं. शेवटी रमा चिडून फिरायला बाहेर गेली, जवळच्याच बागेत फेरफटका मारताना तिथे पाहते तर काय तिच्या शेजारचे 'दामू आण्णा' एका बाजूला शांतपणे काही विचार करत बसलेले. तिचं  लक्ष गेलं झालेल्या घटनेला विसरून तिच्या मनात विचार आला की एरव्ही सगळ्यांशी मिळून-मिसळून, आनंदाने बोलणारे 'दामूआण्णा' आज का बरं एवढे शांत? तिला काही राहवेना; ती गेली अन् त्यांच्या जवळ जाऊन बसली. तिच्याकडे पाहून आण्णांनी स्मितहास्य केलं आणि म्हटले बस बाळा!

असंच इकडचं तिकडचं बोलणं चालू होतं आणि त्यावरून विषय आहे " एकत्र कुटुंब पद्धतीचा" .... त्यांचं कुटुंब आहेच मुळी २०-२५ माणसांचं ; एकत्र राहण्याच महत्त्व ते रमाला समजावत होते, आणि सांगता सांगता कधी त्यांनी अचानक तिच्या समोर त्यांच्या मनातला कप्पा उभा केला हे त्यांना कळालंच नाही. सातवीत असताना शाळेची  फी भरायला पाच रुपये नाहीत म्हणून शाळा सोडायला लागली, तिथून खरा प्रवास सुरू झाला दामू आण्णांचा....

घरात इतकी माणसं आई-वडील आणि पाठी चार भावंडं... आई-वडीलांची शिकवण : काहीही झालं तरी तुमची एकी सोडू नका; जोपर्यंत आहात तोपर्यंत एकत्र रहा! त्याचं दरम्यान बालवयातच आण्णांचे हात वडिलांकडून पिवळे करण्यात आले, जबाबदारी अजून वाढली. दोन भाऊ आणि दोन बहिणी त्यांची शिक्षणं, त्यासाठी तर आर्थिक बाजू कमीच पडत होती. म्हणून परत मुंबईला जावं लागलं. तिथून या सर्वांच्या गरजा भागविण्यासाठी स्वत: ची दु:ख बाजूला ठेवून झटावं लागलं.

ज्या वयात इतर मुलांची शिक्षणं, खेळणं - बागडणं चालू होती, चालू होतं त्याच वयात यांच्या अंगा-खांद्यावर इतक्या जबाबदाऱ्या पडलेल्या. थोडं काही सुरळीत चालू होतं की घराचं काम निघालं आणि सोबतचं त्यांना मुलगा होण्याची आनंदाची बातमी! 

घराला मजूर ठेवण्याइतपतही पैसे नसल्याने पाचही भावंडांनी एकत्र येऊन घराच्या भिंती घामाने सिंचल्या. दोन भावांची शिक्षणं चालू होती आणि तेव्हा घरी शिलाई मशिनीही होत्या, कोणताही क्लास न लावता फक्त टेलरिंग पुस्तक वाचून घेतलेल्या शिक्षणावर दामू आण्णांनी शिलाईची सगळी कलाकुसर शिकून चोळ्या शिवण्याचं काम घेतलं आणि त्यावरच उदरनिर्वाह करीत तो व्यवसाय मोठा केला.

दोन्ही भावांनीही तोच व्यवसाय पुढे चालवायचं ठरवलं आणि अण्णांनी त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला  म्हणजेच सलूनच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यानंतर  दोन्हीं बहिणींची लग्नं लावून दिली, त्यांचे संसार उभे केले. पाठी दोन्हीं भाऊ लग्नाला आले. त्यांचीही लग्न खूप छान झाली. एवढी सगळी माणसं अगदी सुखा- समाधानाने नांदत होती.

कालांतराने मुलांना शिकवलं त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांची लग्नं लावून दिली नातवंडांना खेळवत खेळवत खूप अनुभव त्यांना आले आणि सगळ्या आनंदाच्या ओघातच अचानक वडिलांचे छत्र ते हरवून बसले. जे त्यांचा खूप मोठा आधार होते. या घटनेतून त्यांना स्वत: ला सावरून, आईला धीर देत संपूर्ण घरालाही आधार द्यायचा होता; पहिल्यापासून मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत आलेले दामूआण्णा आता अजून एका जबाबदारी ला कवटाळायला निघालेले!  

"घरटयातली पिल्ले  जशी त्यांची आई चारा घेऊन येईपर्यंत आस लावून बसतात अगदी तशीच यांच्याकडेसुद्धा घरातल्या प्रत्येक माणूस आशेच्या नजरेनं पाहायचा. स्वत:च्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवत यांनी घरातल्या प्रत्येकाला पाहिजे त्या गोष्टी मिळवून देत; उत्तमाचे संस्कारही शिकवले. कधीही कोणीही बोट दाखवू शकणार नाही अशा चांगल्या शिकवणीत सर्वांना ठेवले.

एका खांबावर दामू आण्णांनी या घराचा तंबू उभा केला. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत स्वत: चे छंद पण जोपासले खूप काही सांगत असताना रमाला त्यांच्या, चेहऱ्यावर अनुभवांच्या सुरकूत्या तर दिसत होत्याच पण तो निखळ आनंदही झळकताना दिसत होता, आण्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर "एवढ्या मोठया घरात दिवस कुठे उगवायचा आणि कुठे संपायचा याचा पत्ताच लागत नसे. बायकांच्या वेगळ्या गप्पा, माणसांचे वेगळे विषय त्यातून भजनाची असलेली आवड. मुलांची दंगामस्ती, खेळ आणि असं बरंच काही! अगदी एका गोकुळाप्रमाणे आहे आमचं घर! 

जरी इतरांच ऐकून घरातल्या कोणत्याही व्यक्तिच्या मनाला विभक्त होण्याच्या विचाराने स्पर्श केला तरी दामू आण्णांच्या एकत्रित पणाच्या विश्र्वासामुळे कोणतीही परिस्थिती त्यांना वेगळं करू शकत नाही कारण एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे ते, अन् फांद्या, पानं म्हणजे बाकी सर्व जरी फांद्या, पानं वेगळी झाली तरी खोड त्यांना कधी आपल्या पासून दुरावत नाही आणि या सर्वांचं मूळ म्हणजे त्यांच्या आई-वडिलांची शिकवण जी यांच्या सर्वांना धरून आहे. या सगळ्या गोष्टी ते सांगताना त्यांच्यातला नेहमी एकत्र राहण्याचा आत्मविश्वास रमाला खुणावत होता.

हे सगळं ऐकत असताना रमाचं मन अगदी भरून  आलं.  दामू आण्णा शेजारचे केव्हा उठून गेले. तिला कळालच नाही, कदाचित त्यांना सुद्धा त्यांच मन कुठेतरी  मोकळं करायचं होतं असं वाटतं पण, जेव्हा जेव्हा रमाला ती सांयकाळ आठवते तेव्हा तेव्हा तिला जाणवतं की आपल्या आयुष्यातली ती सायंकाळ नक्कीच खूप चांगली होती. त्या वेळात दामू आण्णांनी त्यांच मन मोकळं जरूर केलं पण तिच्या मनावर त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द कोरला गेला.

रमाला जबाबदारी स्वीकारताना मनाला मूरड घालायची सुद्धा सवय लागली, सगळ्यांनी मिळून मिसळून वागण्याची बुद्धी दिली, खूप आनंद दिला, इतका की, एरव्ही कुणाचही सहज पटवून न घेणारी रमा आता मात्र एकत्रपणावर बोलू लागली, दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायला लागली. त्याचा ठेवा आयुष्यभर पुरेल तिला आणि खरंच दामूआण्णांनी 'एका खांबावर उभारलेली ही द्वारका' रमासाठी एक वेगळाच आदर्श निर्माण करून गेली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News