राज्य सीईटी कक्षाकडून फोनाफोनी, मेसेज; दुसऱ्यांदा अर्ज भरण्याची वेळ

हरी तुगावकर 
Friday, 28 June 2019

गेल्या वर्षीसारख्याच प्रवेशप्रक्रियेला सुरवात केली. ‘सार’ रद्द केल्याने दोन लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंदणी करून या प्रक्रियेतून जावे लागले आहे.

लातूर - अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया कशी तरी सुरळीत सुरू झाली असताना आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ समोर येत आहे. या प्रवेशासाठी प्रवेश शुल्क भरून, कागदपत्रे दाखल करूनही अर्ज सादर केल्यानंतर राज्य सीईटी कक्षाकडे ते ब्लॅंक दिसत आहेत.

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता राज्य सीईटी कक्षाकडून फोनाफोनी; तसेच मेसेज देऊन पुन्हा अर्ज भरावा अशा सूचना दिल्या जात आहेत. यात एखाद्याला असा फोन किंवा मेसेज आला नाही, त्याचे अर्ज ब्लॅंक असेल तर मात्र त्याला प्रवेशापासून वंचित राहावे लागते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षी अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पहिल्यापासून किचकट व  विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणारी ठरली आहे. राज्य सीईटी कक्षाचे आयुक्त म्हणून डॉ. माणिक गुरसळ यांनी पदभार घेताच ही किचकट असलेली ‘सार’ प्रणाली पहिल्यांदा बंद करून टाकली.

गेल्या वर्षीसारख्याच प्रवेशप्रक्रियेला सुरवात केली. ‘सार’ रद्द केल्याने दोन लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंदणी करून या प्रक्रियेतून जावे लागले आहे. नव्याने सुरू झालेली ही प्रक्रिया आतापर्यंत व्यवस्थित सुरू आहे. 
राज्य सीईटी कक्षाने २२ जूनपासून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी विद्यार्थी अर्ज भरत आहेत. यात ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे सादर करणे, प्रवेश शुल्क सादर करून ही प्रक्रिया यशस्वी पार पाडली जात आहे; पण गेल्या दोन दिवसांपासून काही विद्यार्थ्यांना राज्य सीईटी कक्षाकडून फोन तसेच मेसेजही येत आहेत.

यात तुमचे प्रवेश शुल्काचे स्टेट्‌स यशस्वी आहे. ते पुन्हा भरण्याची गरज नाही; पण लॉगिनवरून अर्ज सादर करण्याच्या सूचना मात्र देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. त्यांना पुन्हा सायबर कॅफेचा आधार घेऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. यात एखाद्याचा फोन लागला नाही किंवा मेसेज आला नाही; पण त्याचा अर्ज ब्लॅंकमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते की काय, असा प्रश्न आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News