चाललय काय? जनतेचे प्रश्‍न प्रचारातून गायबच!

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019
  • गरज प्रबळ विरोधी पक्षाची

निवडणूक महाराष्ट्रात असली, तरी प्रचारात मात्र महाराष्ट्र नाही, हा ‘महाराष्ट्र लापता’ या अग्रलेखातील निष्कर्ष योग्य आहे. राज्यापुढील प्रश्‍नांचे राजकीय पक्षांच्या प्रचारात प्रतिबिंब पडलेले नाही, याचा वस्तुनिष्ठ परामर्ष अग्रलेखात घेतला आहे. विश्‍लेषणात्मक लेखनाचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. एकीकडे भाजपचा सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध प्रचार, तसेच काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचा प्रचारासाठी वापर, तर दुसरीकडे विस्कळित झालेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशी विधानसभा निवडणूक प्रचाराची अवस्था असल्याचे चित्र दिसले. खरेतर सत्ताधारी पक्ष राज्याला भेडसावत असलेल्या मूलभूत समस्यांना बगल देत आहेत, हे समजूनही काँग्रेस आघाडी त्यांना कोंडीत पकडू शकली नाही. उलट आघाडीतील काही नेते प्रक्षोभक विधाने करून सत्ताधाऱ्यांना बळ देत आहेत, यापेक्षा दुर्दैवी बाब ती काय असू शकते? अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार जनतेच्या प्रश्नांवर एकाकी लढताना दिसले. राज्याच्या एका भागात तीव्र पाणीटंचाई, तर दुसरीकडे महापूर, अशा प्रतिकूलतेमुळे खचलेला बळिराजा, बेरोजगारीचा फुगत चाललेला आकडा आणि याविषयीची सरकारची उदासीनता, हे खरेतर महत्त्वाचे मुद्दे; पण त्याचा फायदा विरोधी पक्ष म्हणावा तसा घेऊ शकले नाहीत.
अशोक आफळे, कोल्हापूर

प्रबळ विरोधी पक्ष नसतो, तेव्हा आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या वाटा खुंटतात. परिणामी एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाला महत्त्व आहे. बलवान विरोधी पक्ष असेल तर तो सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेऊ शकतो. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवणे, सरकारवर दबाव आणून चुकीचे निर्णय बदलायला भाग पाडणे यासाठी प्रबळ विरोधी पक्ष गरजेचा आहे.
वैभव जाधव, सोमठाणा, (जि. हिंगोली)  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News