परळी विधानसभा निवडणूक माझ्या जीवन मरणाची: धनंजय मुंडे

प्रविण फुटके
Saturday, 24 August 2019

धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक आवाहन करत पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचे परळी व अंबाजोगाई हे दोनच तालुके पिक विम्यातून कसे वगळले असा टोला त्यांनी लगावला.

परळी वैजीनाथ: आपल्याला विधानसभेला विजयी केले तर मतदार संघाची ताकद निर्माण करु. परळी मतदार संघाला विचारात घेतल्याशिवाय राज्याचे राजकारण होणार नाही, असे म्हणत ही निवडणुक आपल्या जीवन मरणाची असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे, बाबाजानी दुराणी, रुपाली चाकणकर, सतिष चव्हाण, विक्रम काळे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, संदीप क्षीरसागर, सरोजिनी हालगे, अमोल मिटकरी आदींच्या उपस्थित शुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत श्री. मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक आवाहन करत पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचे परळी व अंबाजोगाई हे दोनच तालुके पिक विम्यातून कसे वगळले असा टोला त्यांनी लगावला. दोन वेळा परळीकरांनी लेकीला आशिर्वाद दिले. लेकालाही एकदा आशिर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही दिवंगत मुंडेंचे स्वप्न अपूर्ण
जायकवाडीचे माजलगाव धरणात येणारे पाणी वाण धरणात आणण्याचे आणि परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्याचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. परंतु, गल्ली ते दिल्ली सत्ता असताना त्यांचे स्वप्नही पूर्ण करता आले नाही असेही ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांचे अनेक उद्योगपतींशी ओळखी आहेत. मग, परळीत एकही व्यवसाय का, आणला नाही असा सवालही त्यांनी केला. आपण मात्र, सत्तेत नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे इथे सिमेंट आणि सोलार उद्योग आणला. आशिया खंडात नावलौकिक असलेला वैद्यनाथ कारखाना रसातळाला गेला. शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीचे पैसे भेटले नाहीत असा आरोपही त्यांनी केला. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News