आता पालकांनाही आध्यात्मिक शिक्षणाची गरज वाटते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे नोडल अधिकारी विकासभाई यांचे मत

अकोला - आज महानगरातील कार्पोरेट जगतापासून तर अगदी ग्रामीण भागातील छोट्या वसाहतीपर्यंत मूल्यशिक्षणाच्या आवश्यकतेबद्दल एक नवी जागृती होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे विज्ञानाची प्रचंड शक्ती कुणाच्याही हातचं खेळणं बनत आहे व त्याचे होत असलेले दुष्परिणाम  जगभर दिसत आहे. म्हणून आता मुलांबरोबर पालकांनाही मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे मत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे नोडल अधिकारी विकासभाई यांनी व्यक्त केले.

स्थानिक गांधी रोडवरील राजयोग केंद्रावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यलयाचे अकोला व वाशिम जिल्हाप्रमुख रुखमिनी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी राजयोग केंद्राच्या संचालिका वर्षा दिदी व भारती दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती. वैयक्तिक  आचरणात आलेल्या नीतिमूल्यांच्या अभावामुळे सर्वांचे जीवन असुरक्षित, अस्थिर  व चिंताक्रांत झाले आहे तर सामाजिक जीवनात दिसणाऱ्या  नैतिक मूल्यांच्या अभावामुळे अंतर्गत संघर्ष, भ्रष्टाचार, परस्पर विद्वेष, जातीय हिंसा आणि निर्घृण हत्याकांडे होत आहेत.

एकीकडे शिक्षणाचा व तंत्रज्ञानाचा प्रसार होत असताना माणसाच्या जीवनात सुख आणि शांतीचा मात्र अभाव निर्माण होतो आहे. यासाठी समाजात लोप पावत चाललेल्या उच्च नैतिक मूल्यांची पुनर्उभारणी करणे अगत्याचे आहे. याची सुरुवात शिक्षणापासून झाली पाहिजे, याबाबतही सर्वांचे एकमत आहे. उद्याच्या चांगल्या समाजाच्या निर्मितीचे हे आव्हान पेलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातून पुढाकार घेतला जाण्याची गरज आहे. त्याकरिता ‘यशवंतराव चव्हण महाराष्ट मुक्त विद्यापीठ’ आणि ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’ यांनी एकत्र येऊन नुकताच एक सांमजस्य करार केला आहे. त्या करारान्वये पहिल्या टप्प्यात ‘बी.ए. मूल्य आणि आध्यत्मिक शिक्षण’ हा शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला असून, याचा फायदा घेण्याचेही आवाहन विकासभाई यांनी यावेळी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News