विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचे सहकार्यही गरजेचे 

समीर मगरे
Monday, 29 July 2019

    शाळा नेहमीच विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवीत असते. मुलांना आवश्यक असणारे स्वच्छता, स्वावलंबन, सौजन्यशीलता, लिंगसमभाव इत्यादी गुण रुजावे याकरिता  अनेक उपक्रम राबवित असते. त्यामध्ये पालकांचे सहकार्यही तितकेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी येथे केले.

    शाळा नेहमीच विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवीत असते. मुलांना आवश्यक असणारे स्वच्छता, स्वावलंबन, सौजन्यशीलता, लिंगसमभाव इत्यादी गुण रुजावे याकरिता  अनेक उपक्रम राबवित असते. त्यामध्ये पालकांचे सहकार्यही तितकेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी येथे केले.

विवेकानंद विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या आमसभेत ते बोलत होते. संस्थेच्या उपाध्यक्ष तथा महिला बँकेच्या अध्यक्ष विद्याताई केळकर, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, संचालक सुषमा दाते, समन्वयक विजय कसलीकर, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे, पर्यवेक्षक मारुती जाधव, गतवर्षीच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय उपासनी यावेळी मंचावर उपस्थित होते.

विनायक दाते म्हणाले, आधुनिक काळात विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे तत्व रुजणे महत्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छता स्वावलंबन आणि सहकार्याची भावना निर्माण होण्याकरता शाळेने आपल्या परिसरात तर पालकांनी घरी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल - टीव्ही हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा नीट उपयोग करायला शिकवले पाहिजे. अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढले आहे. अशा स्थितीतही पालक विवेकानंद विद्यालयावर दाखवित असलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेची संस्थेची भरभराट विद्यार्थ्यांच्या विकासावर अवलंबून आहे. त्याकरिता संस्था हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

शाळेचे समन्वयक विजय कासलीकर यांनी याप्रसंगी बोलताना संस्थापक बाबाजी दाते यांनी घालून दिलेला शिस्तीचा वारसा शाळा पुढे चालू ठेवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मारोती जाधव यांनी केले. पालक शिक्षक संघाची भूमिका विद्यार्थ्यांसोबतच शैक्षणिक क्षेत्राच्याही हिताची कशी आहे हे त्यांनी सांगितले. मागील आमसभेच्या इतिवृत्ताचे वाचन अनुपमा दीक्षित यांनी केले. त्यास सभेने टाळ्यांच्या गजरात संमती दिली. 

पालकांच्या विविध सूचनांवर मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे यांनी निवेदन करताना विद्यार्थ्यांच्या वागणुकीशी संबंधित मुद्दे उपस्थित करून सहकार्याची अपेक्षा केली. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. संगीत शिक्षक अनिल रेनकुंटलवार व पूर्णाजी खानोदे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शारदास्तवन सादर केले. 

सभेचे संचालन पालक-शिक्षक संघाचे सचिव संतोष पवार यांनी केले. मीनाक्षी काळे यांनी आभार मानले. यानंतर नवीन वर्षाकरिता पालक प्रतिनिधी निवडण्यात आले. कार्यकारिणीत मुख्याध्यापक पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष म्हणून मनीषा इंगळे तर सहसचिव म्हणून प्रकाश साबळे या पालकांची निवड झाली. नव्या कार्यकारणीला संस्थाचालकांनी शुभेच्छा दिल्या. पाऊस सुरू असतानासुद्धा पालकांनी सभेस मोठा प्रतिसाद दिला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News