पनवेल विधानसभा : निवडणुकीच्या रिंगणात कोण-कोण उतरणार ?

जयेश सावंत (यिनबझ)
Thursday, 5 September 2019

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना आता वेग येऊ लागला आहे.  इच्छुक उमेदवार मतदारसंघातील जनसंपर्क वाढविण्याच्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ पनवेल कसा मागे राहील ?

पनवेल : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना आता वेग येऊ लागला आहे.  इच्छुक उमेदवार मतदारसंघातील जनसंपर्क वाढविण्याच्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ पनवेल कसा मागे राहील ?

मागील अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) वर्चस्व होते, विधानसभा तसेच पोट-निवडणुकांमध्ये शेकापचा उमेदवार हमखास निवडून यायचा. परंतु गेल्या १० ते २० वर्षांमध्ये पनवेलमध्ये काँग्रेस तसेच भाजपचा वाढलेला वरचष्मा आणि रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर या ठाकूर पितापुत्रांच्या राजकीय क्षेत्रातील झालेला उगम यामुळे पनवेलमधून शेकाप हद्दपार होऊ लागली आहे.

बाळाराम पाटील आणि विवेक म्हात्रे असे खंदे नेते असूनही शेकाप, भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या निवडणुकांच्या लढ्यात मागे पडत गेली. पनवेल मतदारसंघांत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता शेकाप एका युवा आणि खंबीर नेतृत्वाची गरज असताना आता शेकापला वाली कोण हे उत्तर वरिष्ठ नेते शोधत आहेत. 

पनवेल मतदारसंघात शेकापचे युवा नेते आणि शेकापचे वरिष्ठ नेते जे एम म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांचा तगडा जनसंपर्क बघता यंदाही त्यांनाच शेकापकडून उमेदवारी दिली जाईल असे म्हटले जात होते. परंतु माजी खासदार रामशेठ ठाकूर व माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांचे व्यावसायिक व कौटुंबिक संबंध अतिशय चांगले असल्याने तसेच लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मावळ मतदारसंघातून उभे राहिलेले खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारपेक्षा जास्त आघाडी मिळवून देण्यामागे असलेला आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोलाचा वाटा या सर्व गोष्टी विचारात घेऊन प्रितम म्हात्रे यांनी पनवेल विधानसभा निवडणूक लढवण्यास माघार घेतल्याची शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते चर्चा करत आहेत.

शिवाय, लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे प्रितम म्हात्रे यांची संभाव्य उमेदवार म्हणून विविध कार्यक्रम, राजकीय सभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात होते, तसे चित्र आता मात्र दिसत नाही. यामुळे प्रितम म्हात्रे हे पनवेल विधानसभा लढवणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापकडून माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे आणि हरेश केणी या तीन नावांची पुष्टि शेकाप पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक लढवण्यासाठी केली गेली आहे असे समजत आहे. 

निश्चित केलेल्या तिन्ही उमेदवारांपैकी काशिनाथ पाटील हे शेतकरी कामगार पक्षातील निर्णय प्रक्रियेतील नेते असून राजकारणाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. ग्रामीण भागात मजबूत पकड असल्याने त्यांना पनवेल विधानसभा लढवण्यासाठी आग्रह केला जात असल्याची चर्चा आहे. अरविंद म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचे कामकाज यशस्वीपणे सांभाळले असून विद्यमान नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. सभागृहात विरोधी पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. हरेश केणी यांनीसुद्धा पनवेल पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले असून सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक आहेत. सभागृहात ते जनतेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत असतात.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांची जरी आघाडी झाली तरी उमेदवार हा शेकापचाच असेल, अशी जास्त शक्यता आहे. युती झाली नाही तरी देखील मुख्य लढत ही शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार व भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यातच होणार आहे. त्यामुळे आगामी पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून विद्यमान आमदार तसेच सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी दिली जाते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तर सेनेकडून शिरीष घरतही निवडणुकीच्या रिंगणात ?

सध्या जरी सेना-भाजप युती असली, तरी जागावाटपावरून इच्छुक उमेदवार नाराज होऊन बंड करण्याची दाट शक्यता असते. आता अंतिम निर्णय काय असेल याची अद्याप तरी कोणालाच कल्पना नाही. मात्र जर सेना-भाजप वेगवेगळे लढले तर पनवेल विधानसभा मतदारसंघात शिरीष घरत यांनी निवडणूक लढवावी यासाठी शिवसैनिक तसेच युवासैनिक आग्रही आहेत. मात्र आम्ही शिरीष घरत यांच्याशी संवाद साधला असता, पक्षाकडून जो आदेश येईल तो मला मान्य असेल, तसेच युती जर कायम राहिली तर युतीधर्म निभवायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसकडून कांतीलाल कडू ?

इतर राजकीय पक्षांप्रमाणेच काँग्रेसही पनवेल मतदारसंघातील निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.शेकापच्या साम्राज्यानंतर गेली अनेक वर्षे काँग्रेसने पनवेलमधील सत्तेचा उपभोग घेतला परंतु, मागील निवडणुकांमध्ये रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमधून भाजप प्रवेश केल्यानंतर  काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आणि काँग्रेस नव्या नेतृत्वाच्या शोधात होती. त्यातच आता काँग्रेसकडून कांतीलाल कडू निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत.  

आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की, कोणत्या पक्षातून कोणता उमेदवार निवणुकीच्या रिंगणात उतरेल. आणि पनवेलमधील जनतेचा कौल कोणाकडे असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News