'अहमदपूर पॅटर्न'चा निर्माता पांचाळ गुरुजी

प्रा. डॉ. मारोती कसाब
Tuesday, 2 July 2019

एकदा वामनराव संध्याकाळी महाविद्यालयाच्या व्हरांड्यात अभ्यास करीत बसले होते. पाटीवर लेखनीने हा विद्यार्थी काय गिरवतोय हे पाहण्यासाठी डोळे सर जवळ आले तर वामनराव गणित सोडवण्यात गुंग होऊन गेलेले...!

पूर्वी समाजात गुरुजींना फार मान होता, आदर होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही मोठेपणी आपण शिक्षक व्हावे असे वाटायचे. वामनराव पांचाळ यांनाही तसे वाटले. लहानपणापासून शिक्षक व्हायचे हे एकच स्वप्न त्यांनी पाहिले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ते सत्यातही उतरविले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गुगळगाव येथे १० जून १९६१ रोजी वामनरावांचा जन्म झाला. बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या जातसमूहात जन्म झाल्यामुळे लहानपणापासून गावगाड्याशी परिचय झालेला. वडील एकुलते एक. त्यांच्या पोटी पुत्रही जन्मला एकुलता एक. घरी पारंपरिक व्यवसायाबरोबर शेतीही होती. पडका वाडा होता. त्याकाळी नुकत्याच खेड्यापाड्यात शाळा उघडत होत्या. दत्तात्रय पांचाळ यांनी आपल्या एकुलत्या मुलाला शाळेत दाखल केले. 

आपल्या सारखे गावगाड्यात न येता मुलाने शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. आई हिरकणबाई मुलाला तयार करून दररोज शाळेत पाठवत असे. गावात सातवीपर्यंत शाळा होती. वामनराव शाळेतील शिक्षकांचे लाडके विद्यार्थी. सातवी उत्तीर्ण झालेल्या वामनरावांपुढे प्रश्न पडला, पुढच्या शिक्षणाचे काय..? कारण तालुक्याचे गाव उमरगा हे साडेतीन कोस दूर अंतरावर. जाणे- येणे पायी चालणे शक्य नव्हते. शिक्षण अर्धवट सोडून पारंपरिक व्यवसाय करावा लागतो की काय, असा प्रश्न पडला. पण गुरुजींनी मार्ग काढला. उदगीर जवळच्या सोमनाथपूर गावात नवीनच वसंतराव नाईक हायस्कूल सुरू झाले होते, तिथे वामनरावांना शिकवायचे पक्के झाले. 
   
गाव सोडून आलेल्या वामनरावांना सोमनाथपूरात करमत नव्हते. कुणी मित्रही नव्हते तेव्हा पुस्तकालाच मित्र बनवून त्यांनी पुस्तकाशी गट्टी जमवली. १९७५ साली वामनराव चांगले गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. तोपर्यंत उदगीर परिसराशी त्यांची नाळ चांगलीच जुळली होती. पुढे अकरावी ते बी. एस्सी. पर्यंतचे शिक्षण त्यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पूर्ण केले. 
   
महाविद्यालयीन जीवनात वामनरावांना अनेक गुरु लाभले. विशेषतः प्राचार्य ना. य. डोळे सरांनी वेळोवेळी खूप मदत केली. त्याकाळी उदयगिरी महाविद्यालय म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपुलकीचं ठिकाण. प्राचार्य डोळे सर स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवायचे. एकदा वामनराव संध्याकाळी महाविद्यालयाच्या व्हरांड्यात अभ्यास करीत बसले होते. पाटीवर लेखनीने हा विद्यार्थी काय गिरवतोय हे पाहण्यासाठी डोळे सर जवळ आले तर वामनराव गणित सोडवण्यात गुंग होऊन गेलेले...! डोळे सर राऊंडवर तसेच पुढे गेले. दुसर्‍या दिवशी महाविद्यालयाच्या सेवकाने वामनराव संध्याकाळी अभ्यासाला आले की, त्यांना एक खोली उघडून दिली आणि सांगितले, "हा फळा आणि हा खडूचा बाॅक्स आणि हे डस्टर... हवी तेवढी गणितं या फळ्यावर लिही, असे साहेबांनी सांगितले आहे."
    
बी. एस्सी. गणित विषयात करणारे फार कमी विद्यार्थी असत. वामनराव हे सर्व प्राध्यापकांचे आवडते विद्यार्थी होते. प्राचार्य डोळे, प्रा. के. आंध्र देव, प्रा. मुस्तादर, दि. लिं. होळीकर आणि भगवानसिंह बयास गुरुजींमुळेच मी घडलो असे आवर्जून ते सांगतात. बी. एस्सी. नंतर नांदेडच्या शासकीय महाविद्यालयात बी.एड्. पूर्ण करून ते खंडाळा ता. अलिबाग जि. रायगड येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. 

अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. १९८५ ते १९८८ अशी तीन वर्षे सेवा करुन ते उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या नागाबुवा विद्यालय, हेळंब या शाळेत दाखल झाले. तेव्हापासून गणिताचे एक उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते या परिसरात परिचित आहेत. १९९१ साली त्यांची बदली शेळगाव येथील राजर्षी शाहू विद्यालयात झाली. त्यानंतर १९९७ साली ते अहमदपूरच्या महात्मा फुले विद्यालयात रुजू झाले आणि मुख्याध्यापक सुवर्णकार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'अहमदपूर पॅटर्न' राबवायला सुरुवात केली. गणिताची गोडी लागावी म्हणून त्यांनी 'हसत खेळत गणित शिका', हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविला. त्यांच्या धडपडीची दखल घेऊन संस्थेने त्यांना उपमुख्याध्यापक या पदावर बढती दिली.

२०१४ पर्यंत त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे महात्मा फुले विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. २०१४ साली संस्थेने त्यांची उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूलवर मुख्याध्यापक पदावर निवड केली. या शाळेच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून ते २०१६ साली हंडरगुळीच्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक/ प्राचार्य म्हणून रुजू झाले. ३० जून २०१९ रोजी ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. 
   
चौतीस वर्षांच्या सेवाकाळात आपण एक शिक्षक आहोत आणि आपल्या शिक्षकांमुळेच आपण आहोत, ही वस्तुस्थिती ते कधीही विसरले नाहीत. गणितासारखा अवघड विषय सोपा करून सांगण्यात पांचाळ सरांचा हातखंडा आहे. सकाळी लवकर शाळेत येणारे आणि सर्वात शेवटी घरी जाणारे शिक्षक ही आपली ओळख त्यांनी मुख्याध्यापक झाले तरी कायम ठेवली. प्रशासनात आल्यावर त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांनाही शिस्त लावली. शिक्षकांच्या मदतीने शाळेत अनेक उपक्रम राबविले. 

हुशार विद्यार्थ्यांना आणि अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन करणे, शाळेत स्पर्धा परीक्षांचे, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करणे, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड आणि संगोपन असे कितीतरी उपक्रम त्यांनी राबविले. शिक्षण संक्रमण सारख्या नियतकालिकात लेख लिहीले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले. शिवाय अनेक उद्बोधन सत्रात तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन केले.

एक आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून शाळा, शिक्षक आणि मुलांसाठी जे जे चांगले म्हणून करता येईल ते सर्व त्यांनी केले. कर्तव्य भावनेने मनापासून केले; म्हणून तर लोक त्यांना मानतात. यापुढेही ते विद्यार्थ्यांना गणिताचे मोफत मार्गदर्शन करणार आहेत...'कर भला तो हो भला', अशी लोक म्हण आहे, ती खरीच आहे. पांचाळ सरांनी शाळेत मुलांना घडविले स्वतःच्या लेकरांना ते जास्त वेळ देऊ शकले नाहीत, तरी त्यांची दोन्ही मुले आज उत्कृष्ट इंजिनिअर म्हणून चांगली कामगिरी करत आहेत. सरांना उत्तम कौटुंबिक सुख समाधान लाभले आहे. त्यांना उत्तम आरोग्यदायी दीर्घायु लाभो, हीच मंगल कामना. सेवानिवृत्तीमित्त खूप खूप शुभेच्छा...!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News