३० हजार वर्षांपूर्वी अश्‍मयुगातील माणूसही हा केक खात होता...

प्रशांत ननावरे
Friday, 1 February 2019

पंधराव्या शतकात ‘पॅनकेक’ला ‘पॅनकेक’ म्हणायला सुरुवात झाली, परंतु या नावावर शिक्कामोर्तब व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्याआधी ‘पॅनकेक’ हा भारतीय केक ‘लोणी केक’, ‘जॉनीकेक’, ‘प्रवासी केक’, ‘बटरव्हीट केक’, ‘ग्रीड केक’ आणि ‘फ्लॅपॅक्‍स’ या नावांनी ओळखला जायचा.  

     क्‍लासिक ब्रेकफास्ट किंवा ब्रंच म्हणून ‘पॅनकेक’ आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. परंतु अनेक संस्कृतींमध्ये हजारो वर्षांपासून ‘पॅनकेक’ हे मुख्य अन्न म्हणून खाल्ले जात असल्याचे अनेक पुरावे आढळून आले आहेत. ३० हजार वर्षांपूर्वी अश्‍मयुगातील माणूसही ‘पॅनकेक’ खात होता, असे तज्ज्ञ सांगतात. ५३०० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेल्या ओट्‌झी (ज्याला ‘हिममानव’ असेही म्हटले जाते) या मानवी अवशेषाच्या पोटातील घटकांमध्ये ‘पॅनकेक’सदृश पदार्थ आढळल्याचा संशोधकांचा दावा आहे.   
     खाद्य अभ्यासकांच्या मते, हिममानव जंगली गव्हाच्या पीठापासून तयार केलेला पसरट पदार्थ खात असे, ज्याला लॅटीन भाषेत ‘अलिता डॉल्शिया’ असे म्हणतात. हा पदार्थ रोमन लोकांनी पहिल्या शतकात दूध, पीठ, अंड आणि मसाल्यांच्या पदार्थांपासून तयार केलेला होता. तेव्हा बाजारातील नाक्‍यावर गरमागरम ‘पॅनकेक’ तयार करून विकले जात असत आणि त्याला गोड बनवण्यासाठी मधाचा वापर केला जात असे.  
     प्राचीन ग्रीक कवी, क्रॅटिनस आणि मॅग्नेस यांनी त्यांच्या काव्यात ‘पॅनकेक’बद्दल लिहिले आहे. शेक्‍सपियरनेही त्याच्या प्रसिद्ध नाटकात ‘पॅनकेक’चा उल्लेख केलेला आढळतो. रेनेसान्सच्या काळात मसाले, गुलाबाचं पाणी, शेरी (दक्षिण स्पेनमधील पिवळी किंवा तपकिरी रंगाची दारू) आणि सफरचंदाच्या तुकड्यांचा वापर करून ‘पॅनकेक’ बनवले जायचे.
पंधराव्या शतकात ‘पॅनकेक’ला ‘पॅनकेक’ म्हणायला सुरुवात झाली, परंतु या नावावर शिक्कामोर्तब व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्याआधी ‘पॅनकेक’ हा भारतीय केक (आता नेमका कोणता भारतीय पदार्थ त्याकाळी ‘पॅनकेक’सारखा दिसत होता, हा संशोधनाचा विषय आहे.), ‘लोणी केक’, ‘जॉनीकेक’, ‘प्रवासी केक’, ‘बटरव्हीट केक’, ‘ग्रीड केक’ आणि ‘फ्लॅपॅक्‍स’ (पॅनकेकचे अमेरिकेतील एक नाव) या नावांनी ओळखला जायचा.  
     इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व प्रांतातील बकिंघमशायर येथील ओल्नी टाऊनमध्ये १४४५ साली पहिल्यांदा ‘पॅनकेक दौड’ आयोजित करण्यात आली होती. या दौडच्या बाबतीतली एक दंतकथा अशी सांगितली जाते, की ज्या महिलांचा कौटुंबिक छळ होत असे त्या महिला चर्चची घंटा वाजल्यानंतर फ्राय पॅनमध्ये ‘पॅनकेक’ घेऊन धावत सुटत असत. जी महिला पहिल्यांदा चर्चच्या दाराशी पोहोचेल तिला चर्चची घंटा वाजवणाऱ्याकडून स्मूच (चुंबन) बक्षीस म्हणून मिळत असे. 
     बेकिंग सोडाचा शोध लागण्याआधी १७ व्या शतकापर्यंत ‘पॅनकेक’मध्ये अमोनियाचा अंश असलेला ताजा बर्फ वापरला जात असे. ज्यामुळे ‘पॅनकेक’ हलके आणि फुगीर होण्यास मदत होई. लंडन, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ‘पॅनकेक दिवस’सुद्धा साजरा केला जातो. ‘पॅनकेक मंगळवार’ म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. आता या दिवसाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी पूर्वी ‘इस्टर’च्या आधी ४० दिवस सर्व शर्करा, चरबी आणि अंड्यांचा साठा संपवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात असे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News