'आमचं खत कसदार' राजकारणातल्या लेकाचा बापाला टोला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 July 2019

'आमचं खत कसदार आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणारच' अशी प्रतिक्रिया देत पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं.

मुंबई - 'आमचं खत कसदार आहे त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होईल' असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना सरकारमधील मंत्री दबाव टाकून फोडत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना- भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर नुकतेच शिवसेनेत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीतील आणखी नऊ नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना छेडलं असता 'आमचं खत कसदार आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणारच' अशी प्रतिक्रिया देत पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीतील मरोळ येथे पालिकेच्या मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत 1100 नागरिकांच्या हस्ते एकाच वेळी एकाच ठिकाणी अकराशेहुन अधिक झाडं लावण्याचा उपक्रम पार पडला. सध्या राजकारणातील इनकमिंग पेक्षा पावसाचं इनकमिंग महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News