भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकांचे वारे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • सत्तारूढ पक्ष लवकरच देशव्यापी सदस्यत्व मोहिमेला करणार सुरवात
  • शहा केंद्रात गेल्यानंतर पक्षाध्यक्षपदासाठी नवीन निवड करणे पक्षाला पडणार भाग

नवी दिल्ली : भाजपात आता संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सत्तारूढ पक्ष लवकरच देशव्यापी सदस्यत्व मोहिमेला सुरवात करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रात पंतप्रधानांनंतर सर्वांत महत्त्वाच्या गृहमंत्रिपदावर गेल्यावर नव्या पक्षाध्यक्षांच्या निवडीची औपचारिकताही या वर्षाअखेरपर्यंत पार पाडली जाईल.

दरम्यान, राज्य भाजपची सुकाणू समिती उद्या (ता. ९) शहा यांची भेट घेऊन नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्ती व अन्य बाबींवर चर्चा करणार आहेत. या समितीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह काही महत्त्वाचे पक्षनेते असतात. 
शहा यांनी येत्या १३ व १४ जून रोजी सर्व राज्यांच्या भाजप सरचिटणिसांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. तीत राज्य संघटनात्मक निवडणुका व अन्य बाबींवर ते काही निर्देश देतील. भाजप लवकरच देशपातळीवर संघटनात्मक मोहीम राबविणार आहेत. भाजपच्या घटनेप्रमाणे प्रथम बूथ पातळीपासून तालुका, जिल्हा व राज्यांच्या निवडणुका होतात. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होतात व नंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते.

शहा केंद्रात गेल्यानंतर पक्षाध्यक्षपदासाठी नवीन निवड करणे पक्षाला भाग पडणार आहे. शहा यांची प्रत्येकी तीन वर्षे, याप्रमाणे अध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपत आहे. यासाठी किमान ५० टक्के प्रदेशाध्यक्षांनी नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचे रीतसर नाव सुचिण्याचा प्रघात या पक्षात आहे.

या नावासाठी जे. पी. नड्डा यांचे नाव तूर्त अग्रभागी आहे. मागच्या वर्षीच अपेक्षित असणाऱ्या संघटनात्मक निवडणुका लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या लवकरच सुरू होतील. मोदी-शहा यांनी उत्तर प्रदेश (महेंद्रनाथ पांडे), महाराष्ट्र (रावसाहेब दानवे) व बिहार (रामेश्‍वर तेली) या तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्षांना केंद्रात हलविले आहे. त्यांच्या रिक्त जागांवरील नवीन नियुक्‍त्याही केल्या जातील.

सुकाणू समितीची आज चर्चा
महाराष्ट्र भाजपच्या सुकाणू समितीचे सदस्य उद्या दिल्लीत शहा यांच्याशी चर्चा करतील, असे दानवे यांनी नुकतेच पत्रकारांना सांगितले होते. भाजप मुख्यालयात किंवा महाराष्ट्र सदनात ही प्रस्तावित बैठक होण्याची शक्‍यता आहे. तीत राज्यातील संघटनात्मक निवडणुका व नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीचाही मुद्दा चर्चेत असेल. राज्यात या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक आहे. दानवे यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार, याचा निर्णय शहा घेतील. गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News