तोंडी तलाक विधेयक - कबूल है !

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

‘तोंडी तलाक’च्या प्रथेमुळे अत्यंत चुकीच्या गोष्टींना धैर्याने तोंड देणाऱ्या मुस्लिम महिलांना सॅल्यूट करण्याची ही वेळ आहे. ही प्रथा नष्ट झाल्याने महिलांच्या सक्षमीकरणात भर पडणार असून, त्यांना समाजात सन्मानाने जगण्याचा 
हक्क मिळेल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : विरोधी पक्षांमधील विस्कळितपणाचा लाभ उठवून सरकारने तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात यश मिळविले.

९९ विरुद्ध ८४ अशा मताधिक्‍याने हे विधेयक संमत झाले. अण्णा द्रमुक, संयुक्त जनता दल या सरकारबरोबर असलेल्या पक्षांनी सभात्याग करून सरकारला मदत केली; तर बहुजन समाज पक्ष, तेलुगू देशम पक्ष यांनी मतदानात सहभागी न होता चूपचाप काढता पाय घेऊन हे विधेयक मंजूर होण्यास अप्रत्यक्ष मदत केली. 

तेलंगण राष्ट्र समिती आणि बिजू जनता दल यांनी आयत्या वेळी आपल्या विरोधाची भूमिका बदलून या विधेयकाला पाठिंबा दिल्याने सरकारच्या बाजूने निर्णायक बहुमतास मदत झाली. हे विधेयक सभागृहाच्या निवड समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव तत्पूर्वी नामंजूर करण्यात आला होता.

सरकारने तोंडी तलाक विधेयक संमत करण्याचा विडा उचललेला होता. पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीतही नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाचा मुद्दा विशेष प्रतिष्ठेचा केला होता. राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बहुमतामुळे सरकारला हे विधेयक संमत करता आले नव्हते.

त्यासंदर्भात सरकारने दोन वेळा अध्यादेश जारी करून कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संमत करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. गेल्या वर्षभरात राज्यसभेतील पक्षीय बलाबलात झालेले बदल, भाजपचे वाढते संख्याबळ आणि अनेक विरोधी सदस्यांनी केलेला भाजपप्रवेश यामुळे उचल खाऊन सरकारने हे विधेयक पहिल्याच संसदीय अधिवेशनात संमत करण्याचे ठरवून ते उद्दिष्ट साध्य केले.

राज्यसभेत भाजपने बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या चार प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला ओढण्यात यश मिळविले आहे. संयुक्त जनता दल हा पक्ष भाजप आघाडीतील घटकपक्ष आहे. परंतु, तोंडी तलाक विधेयकावर संयुक्त जनता दल, अण्णा द्रमुक आणि वायएसआर काँग्रेस यांची सैद्धांतिक भूमिका असल्याने त्यांनी त्यास विरोध करण्याची भूमिका घेतली. मात्र, वायएसआर काँग्रेस वगळता इतर दोन पक्षांनी सभात्याग करून सरकारला अप्रत्यक्ष मदतच केली. वायएसआर काँग्रेसने विरोधी पक्षांच्या बाजूने मतदान केले.

विरोधी पक्षांमध्ये रणनीतीचा अभाव आणि विस्कळितपणाची बाब आज पुन्हा स्पष्ट झाली. काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तेलुगू देशम पक्षाचे दोन, समाजवादी पक्षाचे दोन, बहुजन समाज पक्षाचे चार आणि आणखीही काही सदस्यांच्या गैरहजेरीमुळे विरोधी पक्ष आपल्या संख्याबळाची ताकद दाखविण्यास असमर्थ ठरले.

सुमारे साडेचार तास चाललेल्या चर्चेत विरोधी पक्षांनी प्रामुख्याने या प्रस्तावित कायद्याचे फौजदारी कायद्यात रूपांतर करण्यास विरोध केला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक हा बेकायदेशीर ठरविल्यानंतर आता त्याबद्दल पुन्हा कायदा करण्याची आवश्‍यकता काय? अशी विचारणा सरकारला केली.

वर्तमान सरकार संपूर्ण मुस्लिम समाजाला या ना त्या कारणाने लक्ष्य करीतच आहे. आता या प्रकारचा कायदा करून मुस्लिमांच्या घराघरांत ते असंतोषाची आग पसरवीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. दिग्विजयसिंह यांनी केवळ मुस्लिम महिलांपुरताच हा कायदा करण्याने सरकारच्या हेतूबद्दल शंका येत असल्याचे सांगितले.
 

आजचा दिवस ऐतिहासिक असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी महिलांना न्याय दिला आहे, ही देशातील स्थित्यंतराची सुरवात आहे.

- रविशंकर प्रसाद, कायदामंत्री
 

तोंडी तलाकविरोधी कायदा आणण्याचे आश्‍वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. आता या कुप्रथेच्या शापातून महिलांची मुक्तता होईल. 

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News