रायगड जिल्ह्यातही 'नाणारला' विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • अनेक स्थानिक संघटनांबरोबरच काही राजकीय पक्षांनीही या प्रकल्पाविरोधात घेतली भूमिका

मुंबई/ रोहा : सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून होणाऱ्या तीव्र विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच ‘राजकीय’ गरजेतून शिवसेनेपुढे काहीशी झुकती भूमिका घेत राज्य सरकारने रत्नागिरीतील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित केला खरा; पण रायगड जिल्ह्यातूनही या प्रकल्पाविरोधात सूर उमटत आहेत.

अनेक स्थानिक संघटनांबरोबरच काही राजकीय पक्षांनीही या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका पाहता तो तीव्र होण्याची शक्‍यता आहे. केंद्रात तसेच राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची भूमिकाही त्यात कळीची ठरणार आहे.

सौदी अरेबियातील ‘अराम्को’ ही कंपनी, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या साह्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यात नाणारमध्ये सुमारे तीन लाख कोटींचा हा प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र हा प्रकल्प पर्यावरणास हानीकारक असल्याची तसेच त्यामुळे मासेमारी व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो अशी भूमिका घेत मच्छीमार संघटनांबरोबरच विविध संघटनांनी त्यास विरोध केला होता.

शिवसेनेनेही त्यास पाठिंबा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे होऊ देणार नाही असे स्पष्ट केले होते. भाजपशी युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अटही शिवसेनेने घातली होती. केंद्र तसेच राज्य सरकारने प्रतिष्ठेचा केलेला हा प्रकल्प राखण्यात अपयश आले असते तर त्याची मोठी आर्थिक किंमत राज्याला मोजावी लागली असती. हा प्रकल्प नाणारमध्ये होणार नसल्यास तो उभारण्याची तयारी आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी दर्शवली होती. या पार्श्‍वभूमीवर हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ न देता रायगडमध्ये हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रकल्पास तेथील जनतेचा विरोध नसल्याचा दावाही सरकारने केला होता.

रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमधील ४० गावांतील ५० हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकरी कामगार पक्ष तसेच मनसेने घेतली आहे. त्याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखालील सर्वहारा संघटना, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान तसेच त्यांच्या सहकारी संघटनांनीही हा प्रदूषणकारी प्रकल्प जिल्ह्यात नको, अशी भूमिका घेत विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधात जनमत तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भार म्हणून रविवारी रोहा तालुक्‍यातील कोकबन, पांगरखार येथे रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानतर्फे एक सभा झाली.

भरपावसातही हजारो शेतकरी या सभेला उपस्थित होते. नवी मुंबईतील ‘आगरी कोळी युथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष नीलेश पाटील, रायगड जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष जयवंत पोफळे हेही या वेळी हजर होते. ‘नाणार’ प्रकल्पाविरोधात जनमत तयार करणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कोकण महाशक्ती संघाचे सचिन चव्हाण, डॉक्‍टर मंगेश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘हा प्रकल्प आम्हाला नकोच, अशी ठाम भूमिका घ्या. आम्ही रत्नागिरीतून प्रकल्प हाकलला. तुम्ही रायगडमधून हाकलून लावा. त्यासाठी आवश्‍यक मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. तेलशुद्धी प्रकल्पात प्रदूषण होत नाही हे सरकारने दाखवून द्यावे, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले.

रायगडमध्ये उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीचे सदस्य स्थानिक शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून आगामी रणनीती ठरवतील. जिल्ह्यातील बळिराजा शेतकरी संघटनेसह काही संघटनाही आमच्यासोबत आहेत. राजकीय पक्ष या लढ्यात नको, अशी सध्या तरी आमची भूमिका आहे. 
अनंत मगर, उपाध्यक्ष, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान

या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांची सभा झाली हे समजले; मात्र या प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घ्यायची, हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील.
शिरीष घरत, शिवसेना, रायगड जिल्हाप्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News