निवडणुक लढण्यापेक्षा भाजपात कोण जाणार याचीच चर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • लढण्यापेक्षा जाणार कोण याचीच चर्चा
  • काँग्रेसमध्ये अस्वस्थता, भाजप काही चेहरे बदलणार 

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक वाढली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. रोज बड्या बड्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत, त्यामुळे काँग्रेस चांगलीच धास्तावली आहे, कार्यकर्ते सैरभैर आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीत काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे पश्‍चिम नागपूर, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे दक्षिण-पश्‍चिम, विशाल मुत्तेमवार दक्षिण नागपूर, अभिजित वंजारी पूर्व नागपूर, नितीन राऊत उत्तर नागपूर, अनिस अहमद मध्य नागपूर हेच उमेदवार राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून आपणच लढणार असल्याचे जाहीर करून वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते मुंबईतून आणि त्यांच्या मतदारसंघातून संदीप जोशी लढणार, अशी चर्चा वर्षभरापासून होती. आमदार सुधाकर देशमुख यांनी सलग दोनदा भाजपला पश्‍चिम जिंकून दिले. मात्र, पश्‍चिम नागपूरचा उमेदवार अद्यापही ठरला नाही, असे भाजपचेच पदाधिकारी खासगीत सांगतात. येथे काँग्रेसमधून उमेदवार आयात केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दक्षिण नागपूरमध्ये माजी आमदार मोहन मते यांनी कार्यक्रमांचा धडका लावला आहे. ते काहीच स्पष्ट बोलत नसले, तरी त्यांना पक्षाने संकेत दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मतदारसंघाला पुरेसा वेळ देण्यासाठी येथील आमदार सुधाकर कोहळे यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचा दावा केला जात आहे.

प्रवीण दटके यांची मध्य नागपूरमधून लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी यापूर्वीसुद्धा तिकीट मागितले होते. आता शहराध्यक्ष करून त्यांचे हात बळकट केल्याचे बोलले जाते. उत्तर नागपूरमध्ये आमदार असतानाही भाजपला अद्याप आपला जम बसवता आलेला नाही. लोकसभेच्या मतांवरून हे दिसून येते. डॉ. मिलिंद माने काँग्रेस-बसपच्या मतविभाजनामुळे निवडून आले होते. त्यात  बसपच्या उमेदवाराची मोठी भूमिका होती. हा फॉर्म्युला या वेळी किती उपयोगी पडतो, हे दिसूनच येणार आहे. लोकसभेत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची उमेदवारी निश्‍चित मानली 
जात आहे.

काँग्रेसचे सोपस्कार पूर्ण

काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार पार पाडले. जे दावेदार आहेत त्यांनीच मुलाखती घेतल्याने या सोपस्कारावरही आक्षेप घेतले जात आहेत. अनेकांनी मुलाखतीही दिल्या नाहीत. काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष, तसेच माजी मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस भवनाची पायरीही चढली नाही. त्यांच्या समर्थकांनीही मुलाखती दिल्या नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही वेळी काँग्रेसच्या उमेदवारास एबी फॉर्मसाठी झुंजावे लागेल आणि दिल्ली-मुंबईत चकरा माराव्या लागणार असल्याचे 
दिसून येते.

  २००९ मधील विजयी उमेदवार २०१४ मधील विजयी उमेदवार लोकसभेतील आघाडी
दक्षिण-पश्‍चिम देवेंद्र फडणवीस ८९,२५८ भाजप देवेंद्र फडणवीस १,१३,९१८ भाजप १,२०,१८५ (भाजप).
दक्षिण नागपूर दीनानाथ पडोळे    ६९,७११    काँग्रेस सुधाकर कोहळे    ८१,२२४    भाजप १,१४,९४५ (भाजप).
पूर्व नागपूर कृष्णा खोपडे ८८,८१४    भाजप कृष्णा खोपडे    ९९,१३६    भाजप १,३५,४५१ (भाजप).
उत्तर नागपूर नितीन राऊत    २७,९२९    काँग्रेस     डॉ. मिलिंद माने    ६८,९०५    भाजप ९६,६९१ (काँग्रेस).
मध्य नागपूर विकास कुंभारे    ५६,३१२    भाजप विकास कुंभारे ८७,५२३    भाजप ९६,३४० (भाजप).
पश्‍चिम नागपूर सुधाकर देशमुख    ५९,९५५    भाजप सुधाकर देशमुख    ८६,५००    भाजप १,०२,९१६ (भाजप).

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News