फक्त 1 रुपयात वकीलांना मिळणार हेअरकटिंगची सेवा

शर्मिला वाळुंज
Thursday, 18 July 2019

देशप्रेमाखातीर आठ दिवस वकीलांचा 1 रुपयात हेअरकट

ठाण्यातील युवा केस कर्तनकाराचा उपक्रम

ठाणे - कुलभूषण जाधव यांचा खटला अवघ्या 1 रुपयात लढविणारे दिग्गज वकील हरीश साळवे यांचा आदर्श ठाण्यातील युवा केस कर्तनकार संतोष राऊत यांनी घेतला आहे. व्यवसायाने केशकर्तनकार असलेले व सध्या वकीलीचे शिक्षण घेणारे संतोष यांनी पुढील आठ दिवस वकीलांचे अवघ्या 1 रुपयात केशरचना (हेअरकट) करण्याचे ठरविले आहे. तसेच वकील झाल्यानंतर सर्व खटले 1 रुपयातच लढण्याचा मानस त्यांनी केला आहे.

याबरोबरच दिग्गज वकील हरीश साळवे हे कधी ठाण्यातील संतोष यांच्या सलूनमध्ये आल्यास त्यांचीही केशरचना अवघ्या 1 रुपयात करुन देण्याचे त्यांनी ठरविले आहे. तसेच साळवे यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळ ग्लोबल ग्रेस नावाचे संतोष राऊत यांचे सलून आहे. वझे केळकर महाविद्यालयातून संतोष यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पारंपारिक व्यवसाय असल्याने शिक्षण घेतानाच त्यांनी केशरचनेचे धडेही गिरविले.

हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याकडे संतोष याने केशरचनेतील वैविध्यत्येचे प्रशिक्षण घेतले. त्यांचे ते लाडके शिष्यही आहेत. केशरचनेचा व्यवसाय करत असतानाच वकीलीचे शिक्षणही घ्यावे असा विचार संतोष यांच्या मनात आला. राज्यशास्त्र या विषयातून पदवी घेतली असल्याने त्यांनी वकीलीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी नुकतीच प्रवेश प्रक्रीया पास केली आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या लढाईत भारताचे दिग्गज वकील हरीश सा‍ळवे यांची भूमिका मोलाची आहे. विशेष म्हणजे हा खटला लढण्यासाठी साळवे यांनी फक्त एक रुपया फी घेतली आहे. त्यांची ही देशभक्ती पाहून संतोष प्रभावित झाले असून आपणही देशासाठी असेच काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

सकाळशी बोलताना ते म्हणाले, वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझ्या प्रॅक्टीक्सच्या काळात मी सर्व खटले हे 1 रुपयातच लढणार आहे. त्याचबरोबर येते आठ दिवस सलूनमध्ये येणाऱ्या वकीलांची अवघ्या एक रुपयात केशरचना करुन देणार आहे.

भविष्यात हरीश साळवे यांची भेट घेण्याची इच्छा आहे. ही भेट झाली, ते कधी आमच्या सलूनमध्ये आल्यास त्यांचीही केशरचना अवघ्या एक रुपयात करुन देण्याची इच्छाही असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News