मांगूरमध्ये वृक्षसंवर्धनासाठी ‘एक विद्यार्थी, एक झाड’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • बारवाडला ड्रीम फाऊंडेशनचा उपक्रम; सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ३०० रोपांची भेट
     

मांगूर - वाढत्या वृक्षतोडीमुळे प्रदूषणासह दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हे ओळखून बारवाडच्या ड्रीम फाऊंडेशनने वृक्षसंवर्धनाचा ध्यास मनाशी बाळगून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला आहे. त्यानुसार त्यांनी बारवाडमधील सरकारी हायस्कूलमध्ये ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम राबवून शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना झाडे भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.

सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या फाऊंडेशनची स्थापना झाली आहे. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जे लोक वृक्षारोपण करू इच्छितात, त्यांनाही झाडे भेट देण्यात येणार आहेत. केवळ झाडे भेट देऊन तेथेच न थांबता प्रत्येक विद्यार्थ्यांना या झाडाची जोपासना करून करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पासाहेब तिटवे यांनी, समाजातील प्रत्येकाने देशासाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या उदात्त भावनेने या फाऊंडेशनची स्थापना केली. संस्थेमार्फत सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना तीनशे रोप भेट दिली आहेत. या शिवाय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही रोप भेट देणार आहे. इतर इच्छुकांनाही रोप भेट देण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले.

कार्यक्रमास गिरीधर निगवे, चंद्रकांत अर्जुनवाडे, धनाजी चौगुले, बाळासाहेब चौगुले, संजय चौगुले, अण्णासाहेब चौगुले, ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष कृष्णात पाटील, माजी उपाध्यक्ष शिवाजी बाचणे, सदस्य विक्रम जाधव, शाळेचे मुख्याध्यापक यू. पी. थरकार, रमेश पाटील, आनंदा चौगले, संगीता पांडव, गीता कोणे, रेखा जाधव, सुरेखा चौगुले, अण्णासाहेब पाटील यांच्यासह एसडीएमसी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी  उपस्थित होत्या. 

विद्यार्थी दशेपासून पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून देत रोपांची जोपासना करण्याचे ध्येय ठेवून हा उपक्रम राबविला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इच्छुक नागरिकांनीही संपर्क साधल्यास रोपे देऊ. - आप्पासाहेब तिटवे, अध्यक्ष, ड्रीम फाऊंडेशन, बारवाड

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News