आता रोबोट करणार दिल्लीत नालेसफाई!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

असा असेल यंत्रमानव

  • ८० किलोग्रॅम यंत्रमानवाचे वजन
  • १.५ मीटर उंची
  • ४ लाख रुपयेएका रोबोची किंमत

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील चिंचोळ्या गल्ल्यांमधील नाल्यांच्या साफसफाईसाठी दिल्ली सरकार यंत्रमानवांचा अर्थात रोबोंचा वापर करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. या अनुषंगाने दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम हे जुलैच्या अखेरीस केरळमध्ये जाणार असून, तेथे ते अभियंत्यांशी चर्चा करतील. तत्पूर्वी, फेब्रुवारी महिन्यामध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने दोनशे स्वच्छता यंत्रांची खरेदी केली होती. ही यंत्रे आकाराने मोठी असल्याने ती चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये नेणे शक्‍य नसल्याने सरकारची कोंडी झाली आहे.

अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये लोक आज देखील हातानेच मैला साफ करण्याचे काम करतात. बऱ्याचदा यासाठी कसल्याही प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय आखले जात नाहीत. मानवी मैलाची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. आता येथून पुढे यंत्रमानवच मॅनहोल्समध्ये उतरून साफसफाई करतील, अशी माहिती गौतम यांनी दिली.

दक्षिणेकडील राज्यांत वापर
बंदीकूट नावाचा यंत्रमानव हा पंधरा मिनिटांमध्ये एक छोटा नाला साफ करू शकतो, तर मोठ्या नाल्यांसाठी हा कालावधी ४५ मिनिटे एवढा आहे. तो वीसमीटर खोलीपर्यंतच्या नाल्यातही उतरू शकतो. केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील महापालिकांनी याआधीच यंत्रमानवांचा वापर सुरू केला आहे. या यंत्रमानवांना हाताळण्याचे प्रशिक्षणही सफाई कामगारांना देण्यात आले आहे.

आचारसंहितेचा खोडा
केरळमधील ‘जेनरोबोटिक्‍स’ या कंपनीने यासाठीचे यंत्रमानव तयार केले असून, याचा लाइव्ह डेमो देखील मंत्र्यांना दाखविला जाणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये आयआयटी दिल्लीतील तज्ज्ञ, जलमंडळाचे अधिकारी आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यंत्रमानवाच्या वापराबाबत चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तेव्हा हे यंत्रमानव खरेदी करणे शक्‍य झाले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांमध्ये देशभर नाले आणि गटारांमध्ये साफसफाई करताना ८८ जणांचा मृत्यू झाला असून, दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजे अठरा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, कायद्याने मानवी मैला हाताने साफ करण्यास अथवा तो डोक्‍यावरून वाहून नेण्यावर बंदी असताना देखील ही प्रथा अजूनही कायम आहे. मागील दशकभरामध्ये मानवी मैला हातानेच साफ केल्याने १ हजार ८५० जण मरण पावले. या कामगारांपैकी रोज एकाचा मृत्यू होत असल्याचा दावा दिल्ली सफाई कर्मचारी आंदोलन समितीने केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News