आता नवी मुंबईतही ‘नमो नमः’, ५७ नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

"महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही आमचे नेते गणेश नाईक यांना कळवणार आहोत. यापुढेही त्यांची साथ राहावी, अशी सर्वांची इच्छा आहे."

- अनंत सुतार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील राष्ट्रवादीचे तब्बल ५७ नगरसेवक आमदार संदीप नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी नगरसेवकांची बैठक झाली.

त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. विकासासाठी सत्ता हवी आणि ती भाजपमध्ये गेल्याशिवाय मिळणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी व्यक्त केले. त्यांच्या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे.

भाजप प्रवेशाच्या बातम्यांमुळे नवी मुंबईचे वातावरण ढवळून निघाले आहे. शहरातील कार्यकर्त्यांमध्ये, समाजमाध्यामांवर, प्रसिद्धिमाध्यमांवर नाईक कुटुंबीय व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबत चर्चा सुरू आहे; मात्र गणेश नाईक यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितल्याने नगरसेवकांनी एकमेकांची मते जाणून घेण्यासाठी सोमवारी बैठक घेतली.

बेलापुरातील पारसिक हिलवरील महापौर निवासस्थानावर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली. धार्मिक विधीमुळे काहींच्या अनुपस्थितीचा अपवाद सोडल्यास इतर सर्व उपस्थित होते. बैठकीला अनंत सुतार यांनी मार्गदर्शन केले. भाजप एक-एक करून सर्व राज्ये जिंकत आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

मंदा म्हात्रेंचे शरसंधान 
नाईक कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशावर बेलापूरच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सडकून टीका केली आहे. हे काही भाजपच्या प्रेमापोटी येत नाहीत. संपुष्टात आलेल्या नेत्यांना पक्षात घेऊन काय फायदा? सत्तेतून पैसा आणि पदे घेण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप म्हात्रे यांनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News