आता रिकाम्या दूधपिशव्यांचेही मिळणार पैसे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • पर्यावरणमंत्र्यांची माहिती; योजना महिन्याभरात, ३१ टन घनकचरा कमी होणार

मुंबई : दररोज एक कोटी दूध पिशव्या रस्त्यावर पडतात, यापुढे दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी दूध पिशवी रिकामी झालेली परत करावी, ती स्वीकारून त्या दूध पिशवीची ५० पैसे रक्कम रोज परत केली जाईल, अशी योजना एका महिन्यात अमलात आणली जाणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री  रामदास कदम यांनी गुरुवारी विधानसभेत  दिली. 

दरम्यान, ही योजना अंमलात आणल्यास  दिवसाला ३१ टन दूध पिशव्यांचा घनकचरा कमी होईल, असे ते म्हणाले. 

राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून, त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला २३,७०२ मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील १२,५४८ मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, त्यापुढे त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून शेतकऱ्यांना कमी दरात विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे  कदम यांनी सांगितले. विधानसभेच्या विशेष बैठकीत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी या लक्षवेधीवर प्रश्न उपस्थित केले. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर या भागातून ट्रेनने येणारे लोक प्लॅस्टिक घेऊन येतात, त्यावर काय कारवाई केली आणि जमा होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी या वेळी उपस्थित केला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News